पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह जुनी बेज, नवी बेज, गांगवन, नाकोडा, भेंडी, भादवण यांसह तालुक्यातील पाटस्थळ व शिवारात तसेच माळमाथा भागात यंदा रब्बीत होणारी गव्हाची पेरणी झाली नसल्यामुळे परिसरात गव्हाच्या मळणीसाठी दाखल झालेल्या हार्वेस्टर यंत्रधारकांना परिसरात गहू पेरणी यंदा झालीच नसल्यामुळे काम मिळत नसल्याने परराज्यातून आलेले हार्वेस्टर यंत्रधारक आपापल्या लवाजम्यासह मुळगावी परतीच्या मार्गावर असून, वर्षानुवर्षे परिसरात दाखल होणाऱ्या या हार्वेस्टरधारकांना यंदा येण्या-जाण्याच्या प्रवासाइतकेही उत्पन्न मिळाले नसल्याने परिसरात दाखल झालेले हे परराज्यातील हार्वेस्टरधारक हवालदिल झाले आहेत. दुष्काळी स्थितीमुळे या यंत्रधारकांवर संक्रांत आली आहे.कळवणची अतिशय समृद्ध तालुका म्हणून जिल्हाभर ओळख आहे. आजवर या तालुक्याला १९७२ पासून काडीमात्र दुष्काळ जाणवला नाही. परंतु यंदा या तालुक्यावर पावसाने वक्रदृष्टी केल्याने यंदा परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. यंदा शेतकऱ्यांना लागवड केलेला कांदा, गहू विहिरींनी अचानक तळ गाठल्याने सोडावा लागला आहे. विहिरींचे खोदकाम ९० ते १०० फूट खोल करूनही विहिरी कोरड्याठाक आहेत. जरी या तालुक्याच्या उशाशी दोन मोठी धरणे असली तरी या तालुक्यातील शेतकरी आज उपाशी आहे. डावा व उजवा कालवा तसेच गिरणा व पुनद नदी या तालुक्याला आजवर वरदान ठरलेली असताना या नदीचे रोटेशन दोन महिन्यांचे आरक्षित झाले आहे. या तालुक्याचे प्रमुख पीक ऊस व कांदा हे होते. परंतु पावसाभावी परिसरातून ऊस पीक नामशेष झाले आहे. त्याचबरोबर यंदा परिसरातून गहू हे रब्बी हंगामातील पीकही शेतकऱ्यांना पाण्याअभावी घेतले नसल्याने जुनी व नवी बेज, गांगवान, नाकोडा या पाचशे हेक्टर गव्हाची लागवड होणाऱ्या पाटस्थळ क्षेत्रात यंदा गव्हाची लागवड झाली नसून संपूर्ण परिसरात ही गहू लागवड झाली नसल्याने हार्वेस्टर यंत्रधारकांना काम मिळत नसल्याने परिसरात दाखल झालेले हार्वेस्टर यंत्रमालक परिसरातून आपल्या मायदेशी रिकाम्या हाती परतण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.कळवण तालुक्यात ज्या काही गावांना पाटस्थळ आहे अशा शिवारातील सर्व शेतकरी हे फक्त गव्हाचे पीक घेत तालुक्यात अशा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गव्हाची पेरणी दरवर्षी होते. दरवर्षी कळवण तालुका व शिवारात दहा हार्वेस्टर यंत्र दाखल होतात व त्यांना दोन महिने रात्रंदिवस काम उपलब्ध होत असते. त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या गावातील क्षेत्राची अगोदर बुकिंग केली जात असते. परंतु दरवर्षी पाऊस कमी कमी होत गेल्याने पाटस्थळाला पाणी येत नसल्यामुळे व शेतकऱ्यांच्या विहिरींना फारसे पाणी उपलब्ध नसल्याने व यंदा नदीचे रोटेशन लांबणीवर गेले असल्यामुळे परिसरात गव्हाची लागवड कमी होऊन हार्वेस्टर यंत्रधारकांवर परिसरात येऊन उपासमारीची वेळ आली आहे. गव्हाच्या मळणीचे क्षेत्र संपत आले की एक एक यंत्र परतीच्या मार्गावर लागायचे. दोन महिने सर्व यंत्र रात्रंदिवस काम करत, इतके क्षेत्र गव्हाचे असते. मागील वर्षी आम्ही प्रत्येक यंत्रमालकाने पंधरा लाखांचा धंदा या परिसरात केला होता. आम्हाला येण्यासाठी साठ हजार व परत जाण्यासाठी साठ हजार खर्च येतो व यंदा या परिसरात तीनच हार्वेस्टर यंत्र दाखल झाले आहेत. (वार्ताहर)
दुष्काळामुळे हार्वेस्टर यंत्रधारकांवर संक्र ांत
By admin | Updated: March 20, 2016 23:16 IST