नाशिक : महाराष्ट्र राज्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आभासी मंचावर गुरुवारपासून प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बकुळ पारेख आणि जागतिक श्रीमती सुंदरी डॉ. आदिती गोवित्रीकर यांच्या उपस्थितीत झाले.
या अधिवेशनात देश विदेशातील १२७ तज्ज्ञ मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे. चार दिवसांच्या संमेलनात एकाच वेळी दोन व्यासपीठावर बालरोगशास्त्राच्या विविध विषयांवर चर्चा होणार असून, त्यामध्ये सुमारे ५ हजारावर तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यावेळी राज्य संघटनेचे सचिव नाशिकचे डॉ. सदाचार उजळंबकर व कार्यकारी सहसचिव डॉ. श्रीपाद जहागीरदार व डॉ. जय भांडारकर उपस्थित होते. या अधिवेशनात कोविडची लस बालकांना कशी, कधी देता येईल, तसेच कोरोनामुळे बालकांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक ,भावनिक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तसेच कमी दिवसाच्या नवजात अर्भकापासून ते वयात येणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांच्या विविध अडचणींवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे.