नाशिक : सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील सिडको आणि म्हाडांतर्गत येणाऱ्या धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. सिडकोत २००९ पूर्वीची १९८ तर नंतरची ३१ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी जाहीर करण्यात आली आहे, तर म्हाडाच्या यादीत २१ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. सिडको व म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणात मात्र ट्रस्टी कोण माहिती नाही, वर्षाचा पुरावा उपलब्ध नाही, वाहतुकीस अडथळा ठरतो पण ती नियमित करावी, अशी संभ्रमात टाकणारी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सिडको-म्हाडाने सर्वेक्षणात ‘टोलवाटोलवी’ केल्याचे चित्र दिसून येत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत २०११ मध्ये महापालिकांना कारवाईचे आदेश काढले होते. मात्र, कारवाईला झालेल्या विलंबामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल होऊन न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासाठी २१ आॅक्टोबर २०१५ पासून दोन वर्षे इतका कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार, महापालिकेने चार महिन्यांपूर्वी शहरातील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात महापालिका हद्दीत सन २००९ पूर्वीची १०६४, तर सन २००९ नंतरची २८४ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली. त्यात सन २००९ नंतर उभी राहिलेली २८४ धार्मिक स्थळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीनुसार २७ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हटविण्याची कारवाई महापालिकेला करायची आहे, तर २९ सप्टेंबर २००९ पूर्वीच्या १०६४ अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत नियमितीकरण, स्थलांतरण अन्यथा निष्कासन या तीन पातळ्यांवर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यातील जी बांधकामे रस्त्यात अडथळा ठरणार नसतील आणि कागदोपत्री काही पुरावे असतील तर ती नियमित करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, सदर सर्वेक्षण हे सिडको व म्हाडांतर्गत येणारी धार्मिक स्थळे वगळून करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेने सिडको व म्हाडाला त्यांच्या हद्दीत येणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांचा स्वतंत्र सर्व्हे करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, सिडको व म्हाडाने सर्वेक्षण केले असून त्याची यादी नागरिकांना पाहण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. सिडकोत सन २००९ पूर्वीची १९८ तर नंतरची ३१ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. म्हाडाच्या जागेवर ३ अनधिकृत धार्मिक स्थळे असून उर्वरित १९ स्थळे म्हाडाने महापालिकेकडे हस्तांतरित केल्याचे म्हटले आहे. मात्र म्हाडाने सदर स्थळांचे वर्गीकरण हे महापालिकेनेच करावे, अशी सूचना करत घोंगडे महापालिकेवर ढकलून दिले आहे.
सिडको, म्हाडाची ‘अशीही’ टोलवाटोलवी
By admin | Updated: April 7, 2016 00:22 IST