सिडको : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष रा. ठाकरे व सिडकोतील शिवसेना विभागप्रमुख यांचा वाढदिवस विनापरवाना साजरा करण्याबरोबरच, गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शिवसेना-मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे पदाधिकारी नितीन माळी, देवचंद केदारे, अर्जुन वेताळ, ललीत वाघ, संदेश जगताप ( सर्व रा.सिडको) यांच्यासह १० ते १५ कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मिळून साईबाबा मंदिर, महाकाली चौक, सिडको नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख रा.ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त विनापरवानगी आरोग्य शिबिर घेत गर्दी जमवली होती. त्यामुळे त्यांच्यावर जमावबंदीचे उल्लंघन करून कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, मंगळवारी (दि.१४) शिवसेनेचे सिडको विभागप्रमुख सुयश पाटील यांनी सिडकोतील पेलीकन पार्क येथे वाढदिवस साजरा करीत, कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र जमवून जमावबंदीचे उल्लंघन केले. या प्रकरणी सुयश पाटील यांच्यासह शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंखे, निखिल मेहंदळे, एकनाथ शिंदे व इतर दहा ते पंधरा जणांनी वाढदिवस साजरा केला, म्हणून अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जमावबंदीच्या आदेशाचे पालन करून, कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी केले आहे.
गर्दी जमविणाऱ्या शिवसेना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST