येवला : तालुक्यातील महालखेडा येथून येवल्याकडे वेगाने निघालेली बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस सातळी गावाजवळील पाटानजीक उलटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. या बसमधून येवला महाविद्यालयात जाणाऱ्या ४० ते ४५ विद्यार्थ्यांसह महालखेडा परिसरातील इतर काही प्रवासी प्रवास करत होते. अपघातात बसमधील चार विद्यार्थ्यांसह वाहकास छाती, डोके व पायाला मार लागल्याने ते जखमी झाले असून, इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना खासगीसह सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बस वेगात असताना ही घटना घडली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. येवला आगाराची मुक्कामी बस (क्र. एमएच २० सीएच ७५९४) महालखेडाहून सोमवारी सकाळी सव्वासात वाजता येवल्याकडे निघाली. या बसमध्ये महालखेडा गावासह परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून५० ते ५५ प्रवासी होते. बस येवल्याच्या दिशेने जात असताना बसपुढे मोटारसायकलस्वार अचानक थांबल्याने बसचालक शरद कवडे यांनी वेगात असलेली बस नियंत्रित करण्यासाठी अचानक ब्रेक लावल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व बस नाल्यात जाऊन उलटली. या घटनेत अमोल खांडेकर, शीतल होंडे, मंथन बीटनोर, विठ्ठल लुटे, वाहक शंकर राजपूत (रा. लहित) हे जखमी झाले. (वार्ताहर)
बस उलटून अपघात; पाच जखमी
By admin | Updated: January 2, 2017 23:15 IST