येवला : शहरात अनेक बँका व वित्तीय संस्थांचे सुमारे १६ एटीएम सेंटर असतानाही केवळ बोटावर मोजण्याइतपत बँकेचे एटीएम सुरू असतात. अन्य बॅँकांचे एटीएम कायम बंद स्थितीत असतात. पैसे काढण्यासाठी एटीएम केंद्रावर गेले की, शटर खाली असल्याने शहरातील नागरिकांसह ग्रामस्थांचा हिरमोड होतो. एटीएममध्ये पैसे नाहीत. शटर बंद केले की आपले काम संपले अशी धारणा बँकांची झाल्याने शटर बाहेर काही सूचना लावण्याची तसदीदेखील घेतली जात नाही. चाकरमान्यांना रविवारी सुटी असते. बाजारासह अन्य कामांसाठी पैसे काढण्याचा इरादा असला तरी रविवारी मात्र पैसेच मिळत नाहीत. नोटाबंदीनंतर दोन महिने उलटले तरीही एटीएम यंत्रणा सक्षमपणे काम करीत नाही. एटीएम मशीन असून अडचण अन् नसून खोळंबा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. रविवारी एटीएम बंद असले की नागरिक संताप व्यक्त करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. अभावाने एखादे एटीएम खुले असले तर तेथे भली मोठी रंग लागते. अनेकवेळा नंबर येण्याच्या आत पैसे देखील संपलेले असतात.बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर कमालीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. अजूनही सामान्य खातेदार बँकेच्या दारात आपले पैसे घेण्यासाठी उभे राहिलेले दिसत आहेत. मध्यमवर्गीय आणि चाकरमान्यांसह शेतकऱ्यांना नोटबंदीचा मोठा परिणाम भोगावा लागत आहे. मजुरांना पैसे देण्यासाठी उपलब्धता न झाल्याने शेतकरी कमालीचा संताप व्यक्त करीत आहेत. धनादेश देखील वेळेत वटत नसल्याने कमालीची नाराजी सर्वत्र व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
एटीएम मशीन असून अडचण, नसून खोळंबा
By admin | Updated: February 21, 2017 01:39 IST