नाशिक : भारताने स्वत:च्या सर्व व्यवस्था मोडित काढल्या असून सध्या ज्या काही व्यवस्था आहेत, त्या सर्व दत्तक घेतलेल्या आहेत. अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र आहे, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. मुळामध्ये व्यवस्थेला ‘अर्थ’ म्हटले जाते. निसर्गाने तयार केलेले स्त्रोत मनुष्य प्रक्रिया करून वापरतो ते संसाधन म्हणजे अर्थशास्त्र होय, असे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोकील यांनी केले.‘क्रेडाई’ तसेच रोटरी, नाशिक सिटीझन फोरम यासारख्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशाचे आर्थिक पुनरुत्थान’ या विषयावर बोकील यांचे व्याख्यानआयोजित करण्यात आले होते.महाकवी कालिदास कलामंदीरात आयोजित व्याख्यानात बोलताना बोकील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कें द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमोर सादर केलेले व्याख्यानावर प्रकाशझोत टाकला. देशाची गरीबी, आर्थिक स्थिती, सक्षम क्षमता, शाश्वत विकासाला पुरक असलेले वातावरण, अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आवश्यक असलेले अपेक्षित बदल, शेतकऱ्यांची आत्महत्या अर्थशास्त्राच्या नजरेतून, तंत्रज्ञानाची गती आणि भारताचे उच्चकोटीचे तत्वज्ञान असे विविध विषय व्यापकपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला. यावेळी बोकील म्हणाले, अर्थशास्त्राचा एक भाग आहे ज्याला वित्तशास्त्र म्हटले जाते. पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे. माध्यम आणि वस्तू याची फरक लक्षात घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. पैसा हे माध्यम असून माध्यम कधीही ताब्यात ठेवता येत नाही तर वस्तू ताब्यात ठेवता येते. पैसा चलनात राहिला हवा; मात्र आपल्याकडे उलटस्थिती असून पैसा हा चलनात राहत नाही, हे दुर्दैव आहे. देशातील शेतकऱ्याकडे जर पुरेसा पैसा उपलब्ध झाला तर आत्महत्येची समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
तत्वज्ञानामुळे तंत्रज्ञानाला दिशा
तंत्रज्ञानामध्ये जेव्हापासून माहिती तंत्रज्ञानाची भर पडली तेव्हापासून ते अधिक गतीमान झाले अन् ते नियंत्रणाबाहेर गेले; मात्र भारताचे तत्वज्ञान हे उच्चकोटीचे असल्यामुळे येथे तंत्रज्ञान दिशाहीन झाले नाही. भारतात तंत्रज्ञानाचा विकास कमी प्रमाणात झाला असला तरी तत्वज्ञानाचा विकास मात्र कितीतरी पटीने अधिक झाल्यामुळे तंत्रज्ञानाला दिशा मिळण्यास मदत झाली आहे. तंत्रज्ञानाचा समतोल राखण्याचे काम तत्वज्ञान करत असते, हे दोन्ही घटक एकमेकांना पुरक आहे, हे विसरून चालणार नाही, असे बोकील यावेळी म्हणाले.