नाशिक : गुजरातची दंगल, रक्षाबंधन आदि कारणांमुळे पहिल्या पर्वणीत भाविकांची गर्दी कमी होती, मात्र दुसऱ्या पर्वणीला भाविकांची संख्या आणखी वाढेल, असा अंदाज आहे़ त्यादृष्टीने पोलीस प्रशासन बंदोबस्ताचे फेरनियोजन करणार असल्याचे सुतोवाच पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी केले आहे़ थोडक्यात कमी गर्दीमध्ये भाविकांची पोलिसांनी अडवणूक केली तेव्हा जास्त गर्दीच्या वेळी काय परिस्थिती असेल याची कल्पना नाशिककरांसह भाविकांनी न केलेलीच बरी़पहिल्या पर्वणीच्या पोलीस बंदोबस्त नियोजनाबाबत बोलताना आयुक्त म्हणाले की, गत सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत दुर्घटना घडली होती, त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आजचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ गत सिंहस्थ साधारणत: दुपारी दीड-दोन वाजेपर्यंत आखाड्यांचे स्रान सुरू होते, मात्र यावेळी दहा वाजेच्या सुमारास सर्व आखाड्यांचे स्नान झाले व भाविकांसाठी रामकुंडही लवकर खुले करण्यात आले़ तसेच शहरातील पोलीस बंदोबस्ताची माहिती नाशिककरांना माध्यमांद्वारे सातत्याने दिली जात होती़परराज्यात सिंहस्थाचा प्रचार करताना तीन शाही पर्वण्यांबरोबरच इतरही सुमारे चाळीस पर्वण्यांचा प्रचार करण्यात आल्याचा परिणाम भाविक संख्येवर झाला का? या प्रश्नावर आयुक्तांनी तेथील राज्यामध्ये केवळ नाशिकमधील स्नानाचे घाट व कसे पोहोचाल याबाबत माहिती देण्यात आल्याचे सांगितले़ पर्वणीतील भाविकांच्या संख्येबाबत विचारणा केली असता यावर निश्चित आकडा सांगता येणार नसला तरी साधारणत: दहा लाख भाविकांनी स्नान केले असावे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे़रामकुंडावर स्नानासाठी येणारे भाविक स्नानानंतर त्वरित बाहेर न निघता नदीपात्रात जास्त वेळ घालवत असल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे दुसऱ्या शाही पर्वणीत ही चूक दुरुस्त करून संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्ताचे फेरनियोजन केले जाणार असल्याचे आयुक्त एस. जगन्नाथन पत्रकारांशी बोलताना म्हणाले़(प्रतिनिधी)
पुढच्या पर्वणीत भाविकांची आणखीन अडवणूक : पोलीस आयुक्त
By admin | Updated: August 29, 2015 23:47 IST