सोग्रस : गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसमित्रांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वडनेरभैरव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सी. बी. इमले यांनी केले. पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेनुसार वडनेरभैरव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा बीटमध्ये पोलीसमित्रांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यात धोडंबे- ६०, शिवरे- ४०, देवरगाव- ५०, वडनेरभैरव- ३५, भाटगाव- ४०, वडाळीभोई- ५० अशा एकूण २७५ पोलीसमित्रांच्या नेमणुका करण्यात आल्या. विशिष्ट प्रसंगी होणारी नाकाबंदी, रात्रीची गस्त, सण-उत्सव, अपघात, महिलांवरील अत्याचार, महिला सक्षमीकरण, निवडणूक आदिप्रसंगी पोलीसमित्रांनी आपापल्या परिसरात सतर्क राहून घडणाऱ्या घटनांचा आढावा घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती सुरक्षितता मिळू शकेल. पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळे बंदोबस्त, गुन्ह्याचा तपास इत्यादि कामांमध्ये पोलीसमित्राचे महत्त्वाचे सहकार्य लाभणार आहे. परिसरात होणाऱ्या संभाव्य चोऱ्या, हाणामाऱ्या, बेकायदेशीर व्यवहार आदिंच्या तपासकामी या पोलीसमित्रांचे सहकार्य लाभणार आहे. (वार्ताहर )
२७५ पोलीसमित्रांची नेमणूक
By admin | Updated: November 24, 2015 21:56 IST