घोटी : साप किंवा नाग असे नुसते नाव काढले की अंगावर काटा येतो. त्यामुळे कुठे साप निघाला मग तो कोणताही असो, त्याला जवळून काय; पण लांबूनही पाहण्याचे धारिष्ट्य कोणी सहसा करीत नाही. मध्यंतरीच्या काळात साप निघाला तर त्याला पकडून मिरविणारे अनेक सर्पमित्र घोटी व इगतपुरी तालुक्यात तयार झाले होते. यातील काहींना सापाने दंश केल्याने अनेक सर्पमित्र या उद्योगातून मागे सरले. प्रचंड पाऊस व वनसंपदेची विपुलता असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात सापांची संख्याही लक्षणीय आहे. तालुक्यात अनेक कुटुंबे शेतावर वस्ती करून राहणे पसंत करीत असून, शेतकामावर सध्या अधिक भर आहे. तालुक्यात एक वर्षात तब्बल २६० जणांना सर्पदंश झाल्याची धक्कादायक माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालानुसार स्पष्ट झाली आहे. यातील एकही व्यक्ती सुदैवाने दगावली नसली तरी घोटीतील ग्रामीण रुग्णालयात तातडीचे उपचार केल्याने या सर्व रुग्णांचे प्राण वाचले आहेत. दरम्यान, ही आकडेवारी केवळ घोटी ग्रामीण रुग्णालयातील असून, तालुक्यात आठ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयातही सर्पदंश रुग्णांची आकडेवारी लक्षणीय आहे.तालुक्यात भातशेतीच्या लागवडीचे काम जोमात सुरू असून, सर्वाधिक शेतकरी व कुटुंबीय दिवसभर शेतातच राबत असतात.शेतावर काम करतानाच शेताच्या बांधात, भाताच्या रोपात लपून बसलेला साप शेतकऱ्यांच्या लक्षात येत नसल्याने हा साप संधी मिळताच दंश करीत असल्याच्या प्रकारात वाढ होत आहे. एक वर्षभरात २६० घटना घडल्या असून, या रुग्णांना उपचारासाठी घोटीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. (वार्ताहर)
वर्षभरात २६० सर्पदंश
By admin | Updated: August 9, 2016 22:12 IST