लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात झालेल्या 140 टक्के पावसामुळे यंदा एकाही गावात पाणी टंचाईची झळ पोहचणार नाही अशी शक्यता असतांना भुजल सव्र्हेक्षण विभागाच्या अहवालानुसार चार गावांना संभाव्य पाणी टंचाईची शक्यता वर्तविली गेली आहे. दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे चारा पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी हंगाम संपेर्पयत चा:याचीही समस्या काही प्रमाणात राहणार आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, उमर्टी, पिमटी व भरकुंड या चार गावांचा संभाव्या पाणी टंचाईत समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून सरासरीचा कमी पाऊस पाऊस होत असल्यामुळे दरवर्षी किमान दीडशे ते जास्तीत जास्त 350 गावांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत होत्या. गेल्या वर्षाचा दुष्काळाने तर संपुर्ण जिल्हाच होरपळला होता. त्या कटू आठवणी यंदाच्या पावसाळ्याने पुसून काढल्या आहेत. यंदा एवढा पाऊस झाला की कुपनलिका, विहिरी ओव्हरफ्लो झाल्या, धरणे ओसंडून वाहू लागली, अद्यापही शेतांमध्ये ओल कायम आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील एकाही गावामध्ये पाणी टंचाईची समस्या राहणार नाही असे वाटत असतांनाच अक्कलकुवा तालुक्यातील चार गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यात सर्वात कमी पाऊसयंदाच्या पावसाळ्यात सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी टक्केवारी ओलांढली आहे. असे असले तरी अक्कलकुवा तालुक्यात सर्वात कमी अर्थात केवळ 102 टक्केच पाऊस झाला आहे. तो देखील अनियमित स्वरूपाचा होता. त्यामुळे या तालुक्यात टंचाई जाणवणार अशी शक्यता होती. त्यानुसार भुजल सव्र्हेक्षण विभागाने केलेल्या निरिक्षण विहिरींच्या निरिक्षणानुसार अक्कलकुवा तालुक्यातीलच चार गावांमध्ये पाणी टंचाई जाणवणार असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. उपसा करण्यास बंदीमहाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 च्या कलम 25 नुसार अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार, उमटी, पिमटी व भरकुंड ही चार गांवे संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गांवे म्हणून घोषित केली आहेत. त्यामुळे या गावांच्या परिसरात कलम 26 अन्वये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून एक कि.मी. च्या क्षेत्रात असलेल्या अन्य कोणत्याही स्त्रोतापासून पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाव्यतिरिक्त उपसा करणेस बंदी घालण्यात येत आहे. तसे आदेशच तळोदा विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. दरवर्षी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई जाणवते. यंदा या भागात देखील चांगला पाऊस झाला आहे. शिवाय लहान,मोठे बंधारे, धरणे भरलेली आहेत. विहिरींना देखील पाणी आहे. त्यामुळे यंदा या भागात पाणी टंचाई नसल्याची स्थिती आहे. अनेक वर्षानंतर या भागात पाणी टंचाईंचे संकट टळले आहे. यंदा केवळ अक्कलकुवा तालुक्यातील चारच गावांच्या परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे ही चार गावे आगामी काळात अर्थात दुस:या टप्प्यापासून टंचाईग्रस्त गावांना उपाययोजना करण्यात येणार आहे.
यंदा 140 टक्के पाऊस होऊनही चार गावांना टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:45 IST