रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित होता. या जिल्ह्यात काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोनच पक्ष प्रबळ होते. पण 2000 नंतर मात्र काँग्रेसचा प्रभाव कमी झाला. 2014 पासून भाजप स्पर्धेत आला. 2019 मध्ये तर काँग्रेसच्या अनेक बडय़ा नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्याने पक्षाचे अस्तित्व टिकेल की नाही, अशी अवस्था असतांना या निवडणुकीत काँग्रेसने आपले मताधिक्य कायम टिकविले आहे. अर्थात मतदार काँग्रेसचे कायम असले तरी आगामी काळात पक्षापुढे संघटनात्मक बांधणी एक आव्हानच ठरणार आहे.नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून, या चारही जागांवर अनेक वर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर परिस्थिती बदलली. 2009 मध्ये नवापूरमध्ये समाजवादी पार्टीचे शरद गावीत व नंदुरबारमधून तेव्हा राष्ट्रवादीत असलेले डॉ.विजयकुमार गावीत हे दोन्ही बंधू विजयी झाले होते. त्यामुळे त्यांनी सत्तेचा निम्मा वाटा काँग्रेसकडून घेतला. त्यानंतर 2014 मध्ये भाजपने दोन जागा घेवून काँग्रेसला धक्का दिला. 2019 मध्ये मात्र काँग्रेसची स्थिती अधिकच बिकट झाली. या काळात राज्यभरातून पक्षातील बडे नेते सोडून भाजप शिवसेनेत सामील झाल्याने ती लाट जिल्ह्यातही पोहोचली होती. जिल्ह्यातील भरत गावीत आणि दीपक पाटील यांनी पक्षाला पहिला धक्का दिला. दीपक पाटील हे तेव्हा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष होते. तर भरत गावीत हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे सुपूत्र. तसे जिल्ह्याच्या राजकारणात तब्बल चार दशके माणिकराव गावीत व सुरूपसिंग नाईक या जोडीचीच छाप होती. पण 2019 मध्ये भरत गावीत यांनी अचानक काँग्रेस सोडल्याने माणिकराव गावीत व सुरूपसिंग नाईक यांच्या मैत्रीत तड गेला. तसे राजकीय आणि सामाजिक दृष्टय़ा ही घटना कार्यकत्र्याच्या व जनमानसाच्या जीव्हारी लागली. काँग्रेससाठी तो मोठा धक्का होता. त्यानंतर काही दिवसांनीच जिल्ह्याचे काँग्रेसचे सूत्र ज्यांच्या हाती होते ते तेव्हाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.अशा स्थितीत जिल्ह्यातील सर्वात अनुभवी आमदार के.सी. पाडवी यांनी पक्षाची सूत्रे हातात घेवून बिथरलेल्या काँग्रेस कार्यकत्र्याना एकत्र केले. भाजपचे नाराज असलेले आमदार उदेसिंग पाडवी यांना सोबत घेवून त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जिल्ह्यातील चारही ठिकाणी प्रबळ काँग्रेसचे उमेदवार देवून निवडणूक लढविण्याची कसरत केली. निवडणूक प्रचाराच्या काळात पक्षाचा एकही बडा नेता जिल्ह्यात प्रचारासाठी आले नाही. पण त्याही स्थितीत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी बजावली. नेते जरी पक्ष सोडून गेले तरी बहुतांश काँग्रेसचे मतदार मात्र पक्षासोबतच राहिल्याचे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. चार पैकी नवापूर आणि अक्कलकुवा या पूर्वीच्याच दोन्ही जागा राखण्यात काँग्रेस पक्षाला यश आले. नवापुरात पुन्हा मतदारांनी सुरूपसिंग नाईकांच्या कामावर विश्वास दर्शविला. तर अक्कलकुव्यात आमदार के.सी. पाडवी यांनी सलग आठव्यांदा विजय मिळविला. अर्थात ही निवडणूक अतिशय चुरशीची रंगली. या ठिकाणी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने के.सी. पाडवी यांना विजयासाठी शेवटर्पयत शिवसेनेच्या उमेदवाराशी झुंझ द्यावी लागली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे स्वत: के.सी. पाडवी हे उमेदवार होते. त्या वेळी त्यांना या मतदार संघातून 91 हजार 632 मते मिळाली होती. या वेळी मात्र त्यांचे मताधिक्य घटले. त्यांना 80 हजार 532 मते मिळाली, पण विजयी झाले. एकूणच विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या गळतीनंतरही काँग्रेसची स्थिती समाधानकारक राहिली. विशेष म्हणजे 2014 चे मताधिक्य व जागा टिकविण्यात पक्षाला यश आले. संघटनात्मक दृष्टय़ा निश्चितच घडी विस्कटली आहे. जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्षांनी तसेच इतर पदाधिका:यांनी ऐनवेळी पक्ष सोडल्यानंतर तात्पुरत्या स्थितीत दिलीप नाईक व सुभाष पाटील या दोघांकडे जिल्हा कार्याध्यक्षांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता या नेत्यांच्या फळीत माजी आमदार उदेसिंग पाडवी यांची भर झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाला आपले अस्तित्व व राजकीय प्रभाव टिकविण्यासाठी संघटनात्मक बांधणीकडे अधिक लक्ष घालावे लागणार आहे. नव्हे तर ते पक्षापुढे आव्हानच ठरले आहे.
2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मते
2,90,253
लढवलेल्या जागा - 04
विजयी - 02
2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मते
2,94,369
लढवलेल्या जागा - 04विजयी - 02