वीज वितरण कंपनीच्या पथकांकडून जिल्ह्यात नियमित तपासणी सध्या सुरु आहे. यात वीज चोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची महावितरणच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी करण्यात येते. मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे अनुमानित बिल देऊन संबंधितांकडून दंड आकारला जातो. वीजचोरीचे अनुमानित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला मुदत दिली जाते. तथापि, निर्धारित मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
असा केला जातो मीटरमध्ये फेरफार
मीटरमध्ये फेरफार करून मीटरमध्ये गती कमी करणे, रिमोटच्या साह्याने मीटर बंद करणे, मीटर बायपास करणे, मीटर असतानाही आकडा टाकून वीजचोरी करणे अशा प्रकारे वीजचोरी केली जाते.
महावितरण सर्व ग्राहकांच्या मासिक वीजवापराचे नियमित विश्लेषण करत असते. यात काही ग्राहकांचा वीजवापर कमी झाल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांचा वीजवापर खरोखर कमी झाला आहे की काही फेरफार केला, याची पडताळणी महावितरणकडून केली जाते. यासाठी मोहीम राबवून वीजचोरांवर धडक कारवाई केली जाते. वीजचोरी केलेल्या ग्राहकाने वीजचोरीचे अनुमानित बिल व दंडाची रक्कम भरल्यास त्याचा वीजपुरवठा सुरू ठेवला जातो. मात्र वीजचोरीचे बिल न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जातो.
भरभक्कम दंडाची तरतूद प्रति केडब्ल्यू किंवा एचपीनुसार
औद्योगिक - १० हजार रुपये
वाणिज्यिक - ५ हजार रुपये
कृषी - १ हजार रुपये
इतर - २ हजार रुपये
दरम्यान दंडात्मक कारवाईंतर्गत मीटर रीडिंगची दुप्पट रक्कम द्यावी लागेल. वीज चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात २०२० यावर्षात वीज चोरीचे तब्बल ३४० प्रकार समोर आले होते. एकूण ५५ लाख ५७ हजार रूपयांची वीज चोरी याकाळात झाली होती. २०२१ या वर्षात ९७ केसेस दाखल झाल्या होत्या. यातून २८ लाख पाच हजार रूपयांचा दंड चोरट्यांना करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.