तळोदा : तळोद्यात किरकोळ कारणावरून दोन गट भिडले. दोन्ही गटांनी चाकू, लोखंडी सळई, लाठ्या व काठ्यांचा सर्रास वापर केला. या मारहाणीत दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना नंदुरबारातील जिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तळोदा पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.तळोदा येथील प्रधान हट्टी व कल्पना टॉकीज परिसरातील दोन गटात जुनी केस मागे घेण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान दोन्ही गटातील जमावांनी एकमेकांवर चाल करण्यात झाले. लाठ्या, काठ्या, चाकू, लोखंडी सळई यांचा उपयोग करण्यात आला. यात येवास अशोक मोरे व राकेश कालुसिंग ठाकरे हे जखमी झाले. त्यांना अनुक्रमे जिल्हा रुग्णालय व नंदुरबारातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्याने दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली फिर्याद येवास अशोक मोरे यांनी फिर्याद दिली. त्यावरून राकेश कालुसिंग ठाकरे, मुकेश कालुसिंग ठाकरे व इतर आठ ते दहा जणांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी फिर्याद राकेश कालुसिंग ठाकरे यांनी दिली. येवास अशोक मोरे, पराग अशोक मोरे, अशोक मोरे, आनंद वाहीद पठाण, सागर राजेश पाडवी, आशिष शैलेश वळवी, अमोल शैलेश वळवी, योगेश प्रभाकर चौधरी व इतर आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस उपअधीक्षक पी.टी.सपकाळ, पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण, फौजदार राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली.
तळोद्यात दोन गट एकमेकांशी भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:58 IST