ब्राह्मणपुरी : जात्यावर दळण दळीते, सुपात गोंधळ घालीत अशी पारंपरिक जात्यावरील गीते आता सध्या २१ व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही. इतकेच नव्हे तर शहरी भागातदेखील जात्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात आजही दिसून येत आहे.
पूर्वीचा काळ वेगळा होता. विद्युतीकरण कुठेच नव्हते. यातच ग्रामीण भागात शेत शिवारातून निघालेले धान्य जात्यावर दळून कसदार अन्न पूर्वीच्या लोकांना मिळत होते आणि त्या वेळेची पिढी सुदृढ आणि सक्षम असायची, असे इतिहास बोलतो. खरे तर पूर्वीच्या काळात जात्यावरच्या डाळी, दळण या ग्रामीण महाराष्ट्र राज्याच्या परंपरेची व संस्कृतीची साक्ष देत होत्या. आजच्या सोशल मीडियाच्या या काळात खेड्यापाड्यात असणारी जाती व जात्यावरील डाळ भरडणे काही प्रमाणात ग्रामीण भागातून कालबाह्य झाले आहे. मात्र शहादा तालुक्यात ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न वयोवृद्ध महिला जात्यावर डाळ भरडून करीत आहेत.
जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीताच्या माध्यमातून व्यक्त करायच्या, सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेहमीची कामे करताना पारंपरिक गाणी गायची. त्याची गोडी होती. म्हणूनच बहिणाबाईंची गाणी आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आजही आपण गुणगुणल्याशिवाय राहत नाही.
असे आहे जाते
कडधान्य दळून त्याची डाळ तसेच बारीक पीठ करण्यासाठी जात्याचा वापर केला जातो. जाते वर्तुळाकार गोल दगडाचे असते. त्यामध्ये दोन तळ्या असतात. खालची तळी ही स्थिर आणि जड असते. वरच्या तळ्याला कडेला एक उंच लाकडी खुंटी असते. ही खुंटी हाती धरून वरची तळी घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवतात. या तळ्याच्यामध्ये एक छिद्र असते त्यातून थोडे थोडे धान्य टाकतात आणि दोन्ही तळ्या एकमेकांवर घासून कडधान्याचे डाळीबरोबरच पीठ होऊन तळ्याच्या कडाच्या फटीतून बाहेर येते.