लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे विरचक, सुसरी व रंगावली धरण पुर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे या तिन्ही धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे हतनूर धरणाचे दरवाजे देखील उघडल्याने तापीही दुथडीभरून वाहत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शिवण, रंगावली, सुसरी व गोमाई नद्यांना पाणी आले आहे. आधीच या नद्यांवरील धरणांमध्ये पाणीसाठा पुर्णक्षमतेने झाला आहे. आता पुन्हा पाऊस सुरू असल्याने व नदीतून पाण्याची आवक सुरू असल्याने पाणी लेव्हल कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विरचकचे तीन दरवाजे उघडलेविरचक धरणात पाण्याची आवक सुरूच असून यामुळे विरचक धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणातून 750 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. जोर्पयत नदीपात्रातून पाण्याची आवक सुरू राहील त्या प्रमाणात हे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बागुल यांनी दिली. धरणात सद्य स्थितीत 93 टक्के पाणीसाठा आहे. अजून परतीचा पाऊस बाकी असल्यामुळे धरण यंदा 100 टक्के भरणार आहे. त्यामुळे नंदुरबार शहराचा पाणी प्रश्न किमान दोन वर्ष मिटला आहे. शिवण नदीला पाणी आल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोमाईलाही पूरसुसरी प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने या धरणाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोमाई नदीला पूर आला आहे. नदी काठावरील लोणखेडा, उंटावद, मलोणी, शहादा, पिंगाणे, लांबोळा, डामरखेडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रंगावलीचेही दरवाजे उघडलेरंगावली प्रकल्पाचे दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. यामुळे या नदीलाही पूर आला आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नवापूरातील नदी काठावरील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजहतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने तापीला पाणी आले आहे. परिणामी सारंगखेडा बॅरेजचे चार तर प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे.
सततचा पावसामुळे पिकं खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस थांबत नसल्यामुळे शेतांमध्ये अंतरमशागतीच्या कामांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतात तण वाढले आहे. खतांच्या आणि किटकनाशकांच्या मात्रा देण्यासाठी देखील अडचणी येत आहेत. सतत असाच पाऊस सुरू राहिल्यास पिकं पिवळी पडून त्यांची उत्पादकता कमी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अनेक शेतांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाणी काढणार तर कुठे हा प्रश्न आहे. कारण शेतालगतचे नाले, विहिरी तुडूंब भरले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पिकांना त्याचा फटका बसत आहे. परिणामी शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता आहे.