लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील जैवविविधतेत मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने त्याचा पर्यावरणावरदेखील परिणाम होत आहे. पावसाचे दिवस कमी झाले असून, तापमानात किमान ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सरदार सरोवरसारख्या महाकाय जलप्रकल्पामुळे सातपुड्यातील भूगर्भातील संरचना कमालीची बदलत असून, भूकंपाचे धक्केदेखील वाढले आहेत.
दरम्यान यू. के. मेट ऑफिस व द एनर्जी रिसोर्स संस्था यांनी रिजन क्लायमेट मॅाडेलिंग सिस्टीमनुसार येत्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वातावरणीय बदल होणार असल्याचा इशारा दिलेला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याने आतापासूनच सतर्क झाले पाहिजे.
जिल्ह्यातील जैवविविधतेत मोठ्या प्रमाणावर बदल होत असून, त्याचा वातावरणीय परिणाम जाणवू लागला आहे. त्यासाठी वेळीच सावध होणे गरजेचे असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वी सातपुड्यात घनदाट जंगल होते. त्यामुळे जैवविविधतादेखील मोठ्या प्रमाणावर होती. त्यानंतर मात्र जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली. जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल नष्ट झाले. आजच्या स्थितीत सातपुड्यात २० टक्केही जंगल उरलेले नाही. त्याचा परिणाम पावसाचे दिवस कमी होणे, तापमानात वाढ होणे असे जाणवू लागले आहेत.
पावसाचे दिवस १४ ते १७ दिवसांनी कमी
वातावरणीय बदलामुळे पावसाचे दिवस कमी झाले आहेत. सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यासह शहादा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी सरासरी ८५ ते १०० टक्के पाऊस पडत होता. ती सरासरी आता ५ ते १० टक्क्यांनी कमी झाली आहे. पावसाचे दिवस जिल्ह्यात पूर्वी सरासरी ६५ ते ७० दिवस होते, ते आता ५० ते ६० दरम्यान आले आहेत. सर्वच भागात एकसमान पावसाची स्थिती आता राहिली नसून एकाच तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पावसाची सरासरी येऊ लागली आहे. गेल्या १५ वर्षांत दोन वर्षे वगळता एकाही वर्षी पावसाने सरासरी गाठलेली नाही, हा चिंतेचा विषय आहे.
तापमानातही वाढ
जंगलतोड, पावसाचे कमी झालेले प्रमाण यामुळे तापमानातही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. पूर्वी ३४ ते ३७ सेल्सिअसपर्यंत राहणारे तापमान आजच्या स्थितीत ३९ ते ४२ अंशावर पोहोचले आहे. मध्य प्रदेश, गुजरात भागाकडून वाहणारे उष्ण वारे पूर्वी सातपुड्यातील जंगलांमुळे अडविले जाऊन त्याची तीव्रता कमी राहत होती. आता सातपुडाच बोडका झाल्याने उष्ण वारे थेट जिल्ह्याच्या सपाट भागातदेखील वाहू लागले आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. येत्या काळात तापमानाची सरासरी ४३ ते ४४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता यापूर्वीच्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे.
भूकंपाचे धक्के वाढले
जिल्ह्याला लागून असलेल्या महाकाय सरदार सरोवर प्रकल्पामुळे सातपुड्यातील भूगर्भातील हालचाली वाढल्या आहेत. त्यांची संरचना बदलत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत. सरदार सरोवर निगमच्या शहादा तालुक्यातील सावळदे भूकंप मापन केंद्रातील नोंदी तपासल्यास त्याला दुजोरा मिळू शकतो. त्यामुळे पर्यावरणीयदृष्ट्या हीदेखील आणखी एक धोक्याची घंटा ठरू शकते.
जैवविविधता जपा
सातपुड्यात जैवविविधतेचा खजाना आहे. विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, सूक्ष्म जीव सातपुड्याची ओळख आहे. फुलपाखरांच्या विविध जातींचा खजिना सातपुड्यात आहे. गोगलगाईंचे समृद्ध विश्व सातपुड्यात आहे. नामशेष होणारे दुर्मीळ पक्षी तोरणमाळच्या जंगलात आढळतात. ही जैवविविधता जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी सामाजिक आणि पर्यावरणीय चळवळ उभी राहिली पाहिजे.