तळोदा : गेल्या २० वर्षांपासून वनविभागाच्या कैचित अडकलेल्या तालुक्यातील इच्छागव्हाण लघुसिंचन प्रकल्पास अखेर परवानगी मिळाल्यानंतर बुधवारी या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. साधारण २४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातून चार गावामधील आदिवासी शेतकऱ्यांची जवळपास ६०० हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे आता संबंधीत विभागाने युद्ध पातळीवर काम पूर्ण करण्याची अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण गावाजवळील स्थानिक नाल्यावर लघुसिंचन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव संबंधीत यंत्रणेने केंद्रशासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावास १९९८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळून चार कोटी ४० लाखांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला होता. तथापि प्रकल्पासाठी लागणारी २५.१७ हेक्टर जमीन वनविभागाच्या परवानगी अभावी रखडली होती. परिणामी धरणाचा प्रश्नही गेल्या २० वर्षांपासून रखडला होता. यासाठी संबंधीत विभागाने वनविभागाकडे पाठपुरावा केला होता.आमदार उदेसिंग पाडवी यांनीही तालुक्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न विधान मंडळाची विधी मंडळ विनंती अर्ज समितीकडे मांडला होता. त्यांनी या समितीलाच सन २०१६ मध्ये प्रत्यक्ष सिंचन प्रकल्पास भेट देण्यासाठी आणले होते. त्या वेळी समितीने धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर वनविभागाकडे सुद्धा पाठपुरावा केला होता. शेवटी वनविभागाने धरणासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीस गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात परवानगी दिली. त्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या या सिंचन प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. त्याचे भूमिपूजन बुधवारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी लघुसिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी. जोशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पाटील, डॉ.राजाराम आखाडे, विश्वनाथ कलाल, आनंद सोनार, यशवंत पाडवी, सुरेश पाडवी, नितीन पाडवी, नगरसेवक भास्कर मराठे, सरपंच दीपक वळवी, जगतसिंग वळवी, नरेश वळवी, रायसिंग पाडवी, ठेकेदार धवल शहा, अभियंता एस.ओ. पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी गावकºयांना मार्गदर्शन करतांना आमदार पाडवी यांनी सांगितले की, इच्छागव्हाण धरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. त्याची धुळखात पडलेली फाईल काढून संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यामुळे त्यास वाढीव निधी व वनविभागाची मंजुरी मिळाली आहे, असे सांगून रापापूर धरणाच्या कामाबाबतही कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे पुढच्या मार्च महिन्यात प्रत्यक्षात त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले. तसेच इतरही प्रकल्पांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावल्यामुळे शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या वेळी विश्वनाथ कलाल, राजेंद्र राजपूत यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन लघुसिंचन विभागाचे अभियंता एस.बी. गावीत यांनी केले.
लघुसिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:03 IST