लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कधीकाळी शहरातील मुख्य चाैकातील बाजारपेठ हा एकमेव आधार नागरिकांसाठी होती. परंतु कालौघात आता शहरातील इतर भागातही दुकाने सुरू झाल्याने त्याठिकाणी नागरिक हजेरी लावत आहेत. परंतू यात नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरचा संडे बाजार मात्र लक्षवेधी ठरला आहे.अवघी पाच वर्षे वयाच्या या बाजारात कधी काळी एक साडी विक्रेता येत होता. आता पाच वर्षानंतर या ठिकाणी १०० पेक्षा अधिक विक्रेते व्यवसाय थाटून रोजगार कमावत आहेत. साधारण पाच वर्षांपूर्वी शहरातील सेंट फ्रँकलिन मेमोरियल चर्चच्या गेटवर एक व्यक्ती दर रविवारी साड्या विक्री करण्यासाठी दिवसभर दुकान लावत होते. कालांतराने याठिकाणी समोर नवीन तहसीलदार कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधली जाऊन हा रस्ता रुंद झाला. यातून तहसीलदार कार्यालयाच्या भितीलगत त्या विक्रेत्याने साड्यांची विक्री दर रविवारी सुरू ठेवली. हळूहळू शहर व परिसरातील महिला ग्राहकांमध्ये याची क्रेझ वाढत गेल्याने दुकानदारांची संख्या ही दर रविवारी वाढत राहिली आहे. मिशन बिगनमध्ये आजच्या रविवारी प्रथमच बाजार पूर्ण क्षमतेने भरल्याचे दिसून आले.
सर्वच ग्राहकांची हजेरी ग्रामीण भागातील नागरीकांसह शहरातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांची याठिकाणी गर्दी होते. रविवारी होणा-या या बाजारात गुजरातमधून व्यापारी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. विस्तार वाढीने चिंतातहसीलदार कार्यालयाच्या भिंतीलगत भरणारा हा संडे बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. तहसीलदार कार्यालयापासून सुरू होणारा हा बाजार गिरीविहार आणि इकडे सिंधी काॅलनीत विस्तारत आहे. यातून काहीअंशी वाहतूक काेंडी होत आहे.
१०० पेक्षा अधिक विक्रेते आजअखेरीस याठिकाणी १०० पेक्षा अधिक विक्रेते सौंदर्य प्रसाधने, चप्पल, साड्या, ड्रेस मटेरियल यासह पुरुषांचे कपडे, लहान मुलांचे कपडे आणि शोभेच्या वस्तूचे दुकान लावत आहेत.सकाळी सात ते सायंकाळी आठ यावेळेत केवळ रविवारीच भरणारा हा बाजार लॉकडाऊनमुळे सात महिने बंद होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा व्यवसाय पुन्हा सुरू झाला असून याठिकाणी पूर्वीप्रमाणेच विक्रेते येत आहेत. यातून खरेदीसाठी आलेल्यांची गर्दी झाल्याचे चित्र रविवारी होते. रस्त्याच्या एका बाजूला भरणाऱ्या या बाजारामुळे परिसरातील खाद्यपदार्थ व चहा विक्रेत्यांचेही व्यवसाय वाढीस लागले.