शहादा तालुक्यातील तोरखेडा परिसरातील शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. या संकटातून सावरताना अवकाळी पावसाचा तडाखाही सहन करावा लागत आहे. आता तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनने खरीप हंगामात पेरणीसाठी खते व बियाणे कशी खरेदीसाठी पैसे कुठून आणावेत, असा प्रश्न पडला आहे. पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने शेतकरी सर्व संकट विसरून शेती मशागतीच्या कामाला लागला खरा, मात्र त्यांना आर्थिक चिंताही सतावत आहे.
शेतकरी निसर्ग व पावसावर शेती फुलवितो. परंतु अल्प पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आदींचा सामना करताना मेटाकुटीला येतो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगत न होता अधोगतीच होत आहे. लॉकडाऊनमुळे कष्टाने शेतात पिकवलेले टरबूज, काकडी, खरबूज, पपई, टमाटे, पालेभाज्या आदी पिकांची विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे उभी पिके शेतात सडली. त्यात पुन्हा अवकाळी गारपिटीचा मारा सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता खरिपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी केंद्र चालकांची मागील वर्षाची उधारी अद्यापही शेतकरी देऊ शकला नाही. आता या खरिपासाठी बी-बियाणे कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.