शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला होता. त्यात १५० च्या आसपास लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यात काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म नियोजन आणि आरोग्य विभागाच्या अथक परिश्रमाने व स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे सारंगखेडा हे आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे. आता स्थानिक विलगीकरण कक्षात फक्त दोन कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.
७४ लोकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
येथील ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य विभागाकडून नुकतीच ७४ लोकांची अँटिजन कोरोना चाचणी केली असता, सर्वच लोकांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांत वेळोवेळी स्थानिक व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाकडून वेळोवेळी सर्वेक्षण, घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी, जनजागृती, संशयित रुग्णांना आयसोलेशन न करता ग्रामपंचायत विलगीकरण कक्षात दाखल करून उपचार करणे, व्यापारी बांधवांनीही शासकीय नियमांचे पालन करत आपला व्यवसाय करणे, या सर्व गोष्टी कोरोना रोखण्यासाठी फलदायी ठरल्याने आज तापी पट्ट्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या सारंगखेडा गाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा, डॉ. किशोर पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी. एम. पाटील, औषध निर्माण अधिकारी एम. बी. परदेशी, आरोग्य सहायक आर. आर. महिरे, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी संतोष डिगराळे, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले. सर्व परिस्थितीवर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ लक्ष ठेवून होते.
ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाच्या उपायोजना
ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाला सहकार्य करत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. ग्रामपंचायतीने वेळोवेळी निर्जंतुकीकरण, औषध फवारणी करण्यात आली. तसेच जनजागृती, कोरोना चाचणी, जनता कर्फ्यू, शासकीय नियमांचे पालन, ग्राहकांनी शासनाने दिलेल्या वेळेत खरेदी करून, सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदींसह उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यानेच प्रशासनाकडून सांगण्यात येते.
कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करायचे असेल, तर प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, हा एकमेव उपाय आहे आणि १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साधले पाहिजे. लस पूर्णतः सुरक्षित असून, नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये.
- जयपालसिंह रावल, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद