नंदुरबार - सलग दुसऱ्यावर्षी कोरोनाचा फटका बैलपोळ्याच्या साज तयार करण्यावर झाला आहे. बद्रिझिरा, (ता. नंदुरबार) येथे घरोघरी साज तयार केला जात असतो. यंदा मोजक्याच कुटुंबांकडून साज तयार करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे पोळ्याच्या साजचा रंगोत्सव गावात दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गेल्या चार पिढ्यांपासून गावात बैलांचा साज तयार करण्याची परंपरा आहे. पोळ्याला बैलांना सजविण्यासाठी बाजारात मिळणारे साज तयार करण्यामागे किती हात राबतात, हे नंदुरबारपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बद्रिझिरा या गावात फिरल्यावर सहज लक्षात येईल. गावातील घरा-घरात साज तयार करण्यासाठी दरवर्षी एकच लगबग दिसून येत असते. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यावर परिणाम झाला आहे. आर्थिक परिस्थिती व इतर कारणांमुळे या गावातील अनेक कुटुंबे मोलमजुरी करून आपली गुजराण करतात. परंतु पोळ्याच्या एक महिना अगोदर या कुटुंबांच्या जीवनात बैलांना सजविण्यासाठीचे रंगीबेरंगी साज बनविण्याच्या निमित्ताने एक प्रकारचा रंगोत्सवच सुरू होतो. गेल्या तीन ते चार पिढ्यांची परंपरा टिकवून ठेवत व आपल्यातील कला जिवंत ठेवत बंजारा कुटुंबांनी हा पारंपरिक व्यवसाय व कला टिकवून ठेवली आहे. बैलांचा साज पाहण्यास सहजसोपा वाटत असला तरी, त्यातील गुंफण आणि कलाकुसर बरीच मेहनतीची आहे. दोरखंड, नाथ, मोरखी, गोंडा, सिरधा, सेल, जोधा आदी वस्तू हातानेच तयार केल्या जातात. येथील कलाकुसर आणि कमी कालावधीत मिळणारा साज हे पाहता, या व्यवसायात काही व्यावसायिक शिरले.
गेल्या काही वर्षांपासून स्थानिक कुटुंबांना कच्चा माल पुरवून त्यांच्याकडून विविध साज तयार करवून घेतले जातात. तेच साज बाजारात अवाच्या सवा भावाने विक्री केले जातात. पूर्वी काही कुटुंबे स्वत: साज तयार करून ते बाजारात विक्री करीत असत. परंतु महागाई आणि कच्चा माल घेण्यासाठी लागणारे भांडवल परवडणारे नसल्यामुळे मजुरीच्या स्वरूपात ही कामे केली जातात. कला आणि मेहनतीच्या दृष्टीने मिळणारा मोबदला अगदीच तोकडा असल्याचीही खंत भाईदास पवार यांनी व्यक्त केली.
शिवाय नवीन पिढीचा कल हा नोकरी, व्यवसाय करण्याकडे आहे. त्यामुळे चार पिढ्यांपासून सुरू असलेली ही कला आता दुर्लक्षित होऊ लागली आहे. शिवाय कोरोनासह इतर विविध अडचणी देखील त्याला कारणीभूत आहेत.
पशुधनाची कमी होत चाललेली संख्या, शेतीची कामे आधुनिक यंत्राने करण्याची ओढ, यंदाची दुष्काळी स्थिती यामुळे पशुधनाची संख्याही कमी होऊ लागली आहे.
शासनाने या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करावी व विविध साहाय्य योजनेच्या माध्यमातून आधुनिक साधने उपलब्ध करून दिल्यास ही कला जिवंत ठेवण्यास मदत होणार आहे.
कोरोना व लॉकडाऊन यामुळे गेल्यावर्षाप्रमाणे यंदाही मोजक्याच कुटुंबांनी बैलांचा साज तयार करण्यास यंदा प्राधान्य दिले. त्यातही अनेकांनी मजुरीवर साज तयार करण्यास प्राधान्य दिले. कारण बाजारात अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे सांगण्यात आले.