शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करा, शेतीमालाला हमीभाव देण्याचा कायदा करा, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर चार ठिकाणी लाखो शेतकरी गेल्या अडीच महिन्यांपासून शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारच्या वतीने अमानुष दडपशाही केली जात आहे. या दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन संलग्न बी.के.एम.यू. शहादा तालुक्याच्या वतीने शहादा-धडगाव रस्त्यावरील म्हसावद गावाजवळ बुडीगव्हाण-पाडळदा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतमजूर युनियनच्या वतीने मंडळ अधिकारी बी.बी. सूर्यवंशी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.सुरेश नाईक, ॲड.राजेंद्र ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शविला. म्हसावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार देवीदास सोनवणे, सुनील बिऱ्हाडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे २०० आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.
या वेळी पेट्रोल-डिझेल तसेच गोडेतेलाची दरवाढ आटोक्यात आणा, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये, तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमान निधीत भरीव वाढ करा, शहादा तालुक्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न्यावे, तापी नदीवरील उपसा सिंचन योजनांची दुरुस्ती करून कार्यान्वित करा, शेतमजुरांचे स्थलांतर थांबवावे व रोजगार उपलब्ध करून द्या, तालुक्यातील शहादा-म्हसावद- धडगाव, शहादा- पाडळदा-कुढावद या प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवा व दुरवस्था झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण करा आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. आंदोलनात ईश्वर पाटील, बुधा पवार, नीतेश ठाकरे, राजू गिरासे, सुशीलाबाई शेमळे, लताबाई सोनवणे, सुकलाल भिल, सुक्राम पवार, सुभाष पवार, कालू पवार, विठोबा मोरे, राणू सूर्यवंशी, छोटू मिस्तरी, ताराबाई भिल यांच्यासह सुमारे २०० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. या आंदोलनात महिला शेतमजुरांचा सहभाग लक्षणीय होता.