लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : पावसाळा सुरू असल्याने हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे प्रकाशा बॅरेजचेदेखील १६ गेट पूर्णत: वर करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंभीर परिस्थिती असतानादेखील नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन मात्र, यात गंभीर नाही. शासनाने लाखो रुपये खर्च करून दिलेली आपत्ती व्यवस्थापनाची एक बोट झाडांमध्ये तर दुसरी रबरी बोट समाज मंदिरात गुंडाळून ठेवली आहे. दोन दिवसावर ऋषिपंचमी, गणेश उत्सव येऊन ठेपल्याने महिला भाविक मोठ्या संख्येने तापी काठावर येतात. त्याअनुषंगाने त्यांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाने लाखो रुपये खर्च करून प्रकाशा येथे दोन बोटी दिलेल्या आहेत. एक फायबर बॉडीची तर दुसरी रबरी बोट आहे. या दोन्ही बोटी प्रकाशा येथे आहेत. मात्र, फायबर बोट अद्यापही झाडांमध्येच पडून आहे. यावरून नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. सध्या पावसाळा संपण्याच्या मार्गावर असून, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हतनूर धरणानेदेखील दोन दिवसापासून १४ गेट उघडले आहे. पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सुलवाडा, सारंखेडा येथील दोन्ही बॅरेजचे गेटदेखील खुले करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाशा येथे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रकाशा येथे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रकाशा बॅरेजने सतर्कता म्हणून १६ गेट पूर्णत: खुले केले आहेत तर दोन गेट अर्धे उघडले आहेत. मात्र, अशा पूर परिस्थितीतदेखील आपत्ती व्यवस्थापनाची यांत्रिक बोट झाडांमध्ये पडून आहे तर दुसरी रबरी बोट एका समाज मंडपामध्ये धूळखात पडून आहे. पावसाळा सुरू असूनही आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी मात्र, पाण्याबाहेर का? यामुळे आपत्ती व्यवस्थापन किती सतर्क आहे हे त्याचे जीवंत उदाहरण म्हणावे लागेल. पूर्ण पावसाळा निघून चालला मात्र अद्यापही यांत्रिकी बोट सज्ज ठेवलेल्या नाहीत. जर अशातच नदीत कोणी वाहून आले किंवा काही अप्रिय घटना घडल्यास त्यांना वाचवेल कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.
ऋषिपंचमी दोन दिवसावर
ऋषीपंचमी दोन दिवसावर येऊन ठेपली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना नसताना ऋषिपंचमीला लाखो महिला भाविक आल्या होत्या. याप्रसंगी प्रकाशा येथील तरुण जे पुण्याहून ट्रेनिंग घेऊन आलेत अशांची ड्युटी लावली होती आणि त्यांनीच नदीत स्नान करताना एक दुर्घटना घडत असताना महिलेला वाचवले होते. आता ऋषीपंचमी दोन दिवसावर आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटी अद्यापही झाडांमध्येच पडून आहे. ऋषिपंचमीला अप्रिय दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पट्टीचा पोहणाऱ्यांना ट्रेनिंग मात्र आता पैसे नाही
पुणे येथे नंदुरबार आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रकाशा येथील १२ लोकांची टीम प्रशिक्षणासाठी २०१५ मध्ये पाठवली होती. हे युवक ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर दरवर्षी गणपतीला, ऋषिपंचमीला, दशा माता विसर्जनाच्यावेळी सज्ज असतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून त्यांना पैसे अदा न झाल्याने ते घरीच आहेत. त्याना मागील मेहनताना मिळावा यासाठी आस लावून बसलो आहेत. आता दोन दिवसावर ऋषिपंचमी आली आहे. त्यानंतर गणेश विसर्जन होणार असल्याने याठिकाणी पट्टीच्या पोहणाऱ्यांना सज्ज ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी अगोदर त्यांना त्यांचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे.