नंदुरबार : लांब पल्ल्याच्या आणि सुरक्षित प्रवासासाठी बहुतांश जण रेल्वेला पसंती देतात. कोरोनामुळे अनेकांनी मात्र पसंतीच्या रेल्वेला टाळले होते. परंतु रक्षाबंधनामुळे रेल्वेचा आरक्षण चार्ट पुन्हा फुल्ल झाल्याचे दिसून येत असून नंदुरबार स्थानकातून आरक्षण करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मात्र वेटिंग मिळाल्याचे दिसून आले होते.
दैनंदिन आणि साप्ताहिक गाड्या सध्या उधना ते जळगाव मार्गावर धावू लागल्या आहेत. या गाड्यांमधून गुजरात राज्यातील सुरत व अहमदाबाद या शहरांसह महाराष्ट्रात विदर्भ परिसरात जाणाऱ्यांची मोठी संख्या असते. यातही दीर्घ काळापासून नोकरीनिमित्त येथे स्थायिक झालेले अनेक जण घरी जावू शकले नव्हते. अशांना यंदाच्या रक्षाबंधनाची संधी मिळाली होती. जोडून सुट्या आल्याने अनेकांनी रजा टाकून कुटुंबासह गावी जाण्यासाठी विविध रेल्वेगाड्यांचे आरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. परंत\ु आधीपासूनच फुल्ल असलेल्या सीट्समुळे अनेकांना वेटिंगवर प्रवास करावा लागला. नंदुरबार स्थानकात येणाऱ्या बहुतांश गाड्यांचा आरक्षण कोटा हा नगण्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरत किंवा जळगाव येथे जातानाही आरक्षणाची सक्ती केली जाते. परंत\ु येणाऱ्या गाड्यांचा कोटा कमी असल्याने तसेच मिळणारी जागाही मागच्या बाजूच्या स्लीपर क्लास बोगीत मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातून विदर्भातील शहरांसाठी अनेकांनी सुरत येथून आरक्षण दाखवत तिकिटे बुक केल्याने काहींना दिलासा मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान रक्षाबंधनानिमित्त अनेक परप्रांतीय कामगार दीर्घ काळानंतर घराकडे परत गेेले होते. आरक्षणाअभावी त्यांना गाडी बदलावी लागल्याचेही प्रकार घडले होते. आरक्षणाची मागणी करुनही त्यांना ते मिळाले नव्हते.
६० टक्के प्रवासी
संख्या वाढली
गेल्या १० ते १५ दिवसात कोरोनामुळे घटलेली प्रवासी संख्या पुन्हा वाढली असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. प्रामुख्याने रक्षाबंधन आणि आगामी काळातील सण यातून ही गर्दी वाढली आहे.
कोरोनामुळे पर्यटन आणि देवदर्शन होऊ न शकलेलेही घराबाहेर पडले आहेत. यातून नवजीवन एक्सप्रेसचे बुकिंग गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने फुल्ल असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर गाड्यांचीही तीच स्थिती आहे.