दुसऱ्याच्या घरातून व जागेतून वीजपुरवठा घेणाऱ्याचा आणि ज्याच्याकडून घेतला त्याचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. तसेच ज्याच्या कडून वीजपुरवठा घेतला आहे त्याला अनुमानित बिल दिले जाते. तसेच यापुढे असा प्रकार केला जाणार नाही याबाबत हमी घेतली जाते.
तसेच एका वर्गवारीसाठी वीजपुरवठा घेऊन त्याचा वापर इतर वर्गवारीसाठी करणे हेही कलम १२६ अन्वये बेकायदेशीर ठरते. घरगुती वापरासाठी वीजपुरवठा घेऊन त्याचा व्यावसायिक व औद्योगिक कारणासाठी वापर करणे. यातही अनुमानित बिल आकारून वर्गवारी बदलण्यास अथवा दुसऱ्या वापरासाठी नवीन जोडणी घेण्यास सांगण्यात येते.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अशा अनेक प्रकरणांत वीजपुरवठा वापर करणाऱ्यांना लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे वीजचोरीविरुद्ध सातत्याने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबविण्यात येत असतात. तरीदेखील काही वीजग्राहक नवनवीन युक्त्या वापरून विजेची चोरी करीत असतात. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम रोख स्वरूपात बक्षीस म्हणून देण्यात येते. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने तडजोड रकमेसह वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येत असून माहिती देणाऱ्याचे नावदेखील गुप्त ठेवण्यात येत असते.
ग्राहकांनी महावितरणकडून अधिकृत वीजपुरवठा घेऊनच वीज वापरावी. तसेच ज्या प्रयोजनासाठी वीजपुरवठा घेतला त्या प्रयोजनासाठीच त्याचा वापर करावा.
- कैलास हुमणे,
मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडळ