नंदुरबार : न्यूमोनियामुळे बालमृत्यू होतात. हे बालमृत्यू रोखण्यासाठी देशभरातील बालकांना न्यूमोकोकल लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १२ जुलैपासून न्यूमोकोकल लस टोचली जाणार असून, त्यासाठी आरोग्य विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
लहान बालकांना न्यूमोकोकल न्यूमोनियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. देशात दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक बालकांचा मृत्यू न्यमोकोकल या आजारामुळे होतो. या आजारापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून, न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण व्हावे, यासाठी न्यूमोकोकल लसीकरण राबविण्यात येणार आहे. राज्यात हे लसीकरण सुरू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात १२ जुलैपासून या लसीकरणाची सुरुवात होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, लहान बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमासोबतच न्यूमोकोकलचे लसीकरण होणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात विविध टप्प्यात हे लसीकरण केले जाणार असून, यासाठी पथकांची नियुक्ती होणार आहे.
काय आहे न्यूमोकोकल न्यूमोनिया
न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसनमार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. बालकांना याचा धोका संभवतो.
जिल्ह्यात विविध टप्प्यात लसीकरण
बालकांना न्यूमोकोकल लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. बालक सहा आठवड्यांचे झाल्यानंतर पहिला डोस दिला जाईल. १४ आठवड्यांचे झाल्यानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे, तर नऊ महिन्यांचे झाल्यानंतर तिसरा डोस दिला जाणार आहे.
खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. जर आजार गंभीर असेल, तर मुलांना खाण्या व पिण्याची अडचण येऊ शकते. तसेच फिट येऊ शकते. त्यामुळे ते बेशुद्धदेखील होऊ शकतात. लहान बालकांमध्ये संसर्गाचा धोका संभवतो.
न्यूमोकोकल आजाराचा संसर्ग बालकांना होऊ नये यासाठी न्यूमोकोकल लस दिली जाणार आहे. या लसीचे तीन डोस बालकांना दिले जाणार आहेत. तिसरा डोस हा बुस्टर डोस असणार आहे. १२ जुलैपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू करणार आहोत. नियोजन सुरू केले आहे.
- डॉ. एन. डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.