नंदुरबार : आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्यासाठी जिल्ह्यातून प्रत्येकवर्षी तीन ते चार अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल केले जातात. यंदा जूनअखेर दोघांनी आंतरराष्ट्रीय परमिटसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना ते प्रदान करण्यात आले आहे. परदेशात गेल्यानंतर तेथे वाहन चालवता यावे, यासाठी या परमिटचा उपयोग केला जातो. वर्षभरानंतर या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते.
जिल्ह्यातून परदेशात नोकरी आणि शिक्षणासाठी काही जण जातात. काही नोकरीनिमित्त त्याचठिकाणी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करतात. यातील ९० टक्के नागरिकांना वाहन चालवता येत असल्याने, त्या देशात वाहन चालवता यावे यासाठी येथील आरटीओकडे अर्ज केला जातो. वर्षभराच्या मुदतीचे हे परवानेही लागलीच दिले जात आहेत. जिल्ह्यातील शहादा तालुक्यातून गेल्या १० वर्षात सर्वाधिक अर्ज़ केले गेले आहेत. याच भागातून सर्वाधिक नागरिक परदेशात रवाना होतात. दरम्यान, लर्निंग लायसन्ससाठी देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा सुरू केली आहे.
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना...
परदेशात वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना असणे गरजेचे असते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा.
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी त्या देशातील व्हिसा व पासपोर्ट यावरील पत्ता एकच असणे गरजेचे आहे.
या आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मुदत एका वर्षाची असते. त्यानंतर तो पुन्हा काढावा लागत असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली.
परमिटची मुदत संपली व परवानाधारक त्याच देशात असेल, तर तेथील भारतीय दूतावासात अर्ज करावा लागतो. यावेळी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करावी लागतात.
कोण काढतो हा वाहन परवाना...
परदेशात शिक्षण व नोकरीनिमित्त तसेच परदेशात वाहन चालक म्हणून नोकरीसाठी जाणाऱ्या युवकांना हा परवाना मिळू शकतो. १८ वर्षे पूर्ण असलेल्या सर्वांना हा वाहन परवाना दिला जाऊ शकतो. त्यांच्याकडे परदेशात जाण्याचा व्हिसा मात्र आवश्यक आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी किमान दोन जण या परवान्यासाठी अर्ज करतात. शहादा तालुक्याच्या विविध भागातील नागरिकच हे परवाने घेतात. यंदा कोरोनामुळे परदेशातून येणे झालेले नसल्याने, ज्यांचा परवाना आहे, त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केल्याचे समजते.
कोरोनामुळे यंदा परदेशात जाणे टाळले असल्याने एक एप्रिल २०२१ नंतर एकही अर्ज दाखल केलेला नाही.
आरटीओ कार्यालय करते संचलन
नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हा परवाना दिला जातो. आरटीओकडून सर्व ती कागदपत्रे तपासूनच परवाने देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशांतर्गत वाहतुकीच्या परवान्यासाठी होणाऱ्या प्रक्रियेप्रमाणेच अर्ज करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कमी कालावधीत हा परवाना दिला जातो.