श्रावण महिन्यात येथील केदारेश्वर, काशीविश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, गौतमेश्वर, संगमेश्वर यासह सर्वच मंदिरांवर भाविकांची दररोज गर्दी असते. येथील केदारेश्वर हे मुख्य मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून दगडी बांधकाम केले आहे. बाजूलाच काशीविश्वेश्वर मंदिर आहे. मंदिरासमोरच दीपमाळ असून परिसराचे विहंगम दृश्य दिसते. मंदिरालगत अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला प्रशस्त घाट होता. मात्र प्रकाशा बॅरेज झाल्यामुळे तो तोडण्यात आला आहे त्यामुळे मंदिराचे सौंदर्य कमी झाले आहे.
काशीनंतरचे पुष्पदंतेश्वर मंदिर
पुष्पदंतेश्वर मंदिर गावाच्या पश्चिमेला तापी नदीच्या काठावर केदारेश्वर मंदिरामागे उंचावर पूर्वाभिमुख आहे. मंदिरावर केलेले नक्षीकाम, मंदिराची रचना, मोठे तट, सभामंडपावरील घुमट, आतील बाजूस महादेवाची पिंड असून ती खोलवर आहे. ही पिंड स्वयंभू आहे. एक राजा मंदिरात नेहमी पूजा करायचा. एके दिवशी पूजा करीत असताना त्याच्याकडे फूल नव्हते. मात्र पूजेत खंड नको म्हणून स्वतःचा दंत काढून ठेवला तर त्या पिंडीवर दंताचे पुष्प झाले म्हणून पुष्पदंतेश्वर मंदिर असे नाव या मंदिराला पडले, अशी आख्यायिका आहे.
संगमेश्वर मंदिर
तापी, गोमाई व पुलिंदा या तीन नद्यांचा संगम याठिकाणी झाला आहे म्हणूनच मंदिराला संगमेश्वर मंदिर पडले आहे. हे मंदिर पश्चिममुखी असून काळ्या पाषाणात भव्य मंदिराची उभारणी शके १६६७ मध्ये करण्यात आली आहे. याचा पुरावा तेथील शिलालेखावरून मिळतो. मंदिरासमोर दोन शिलालेख आहे त्याच्यावर त्याचा उल्लेख केलेला आहे. संगमेश्वर मंदिराच्या बाहेरून पाहिले असता संरक्षण भिंतीच्या आत मंदिर आहे असे जाणवते. संरक्षण भिंतीला तीन फुटाचे छोटेसे प्रवेशद्वार आहे त्यातून आत गेले असता संगमेश्वर महादेव मंदिराचे दर्शन होते. १६ मोठ्या स्तंभांवर सभामंडप आहे, गाभाऱ्यामध्ये गेल्यास संगमेश्वर महादेवाचे दर्शन होते.
सिंहस्थ पर्वणीचे गौतमेश्वर मंदिर
गोमाई नदीकाठावर काळ्या पाषाणातील अतिप्राचीन गौतमेश्वर मंदिर आहे. या मंदिरावर दर १२ वर्षांनी सिंहस्थ पर्वणी भरते. हे मंदिर पूर्वाभिमुख असून जमिनीपासून उंचावर आहे १२ उंच दगडी स्तंभांवर सभामंडप आहे. आतमध्ये गेल्यास शिवलिंगाचे दर्शन होते. काळ्या पाषाणातील अप्रतिम शिवलिंग आहे. मंदिरावर घुमट असून घुमटावर वाघ बसलेल्या अवस्थेत आहे. श्रावण महिन्यात मंदिरावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. गौतम ऋषींना सिंहस्थसाठी त्र्यंबकेश्वरला जायचे होते. परंतु गुरूने सिंह राशीत प्रवेश करण्याच्या मुहूर्तापर्यंत ते त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकले नाहीत आणि त्यावेळी ते प्रकाशा येथे होते. तेथूनच सिंहस्थ पर्वणी करण्याचे ठरवले. साक्षात त्र्यंबकेश्वर प्रकाशात येऊन राहिले व गौतम ऋषींची पर्वणी पार पडली, अशी आख्यायिका आहे.
कर्जातून मुक्ती देणारे ऋणमुक्तेश्वर
प्रकाशा येथे ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे. ज्यांच्यावर सावकाराचे फार कर्ज आहे व ते देण्यास असमर्थ ठरत आहे त्यांनी प्रकाशा येथील ऋणमुक्तेश्वर मंदिरावर येऊन साकडे घालतात व मला कर्जातून मुक्ती मिळावी म्हणून सत्यनारायणाची पूजा किंवा नवस मानले जातात. त्यानंतर त्यांनी याठिकाणी येऊन पाच, सात किंवा अकरा सोमवार येऊन महादेवाचे दर्शन घेतल्यास त्यांना कर्जातून मुक्ती मिळते, अशी आख्यायिका आहे. म्हणून या मंदिराला ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर असे म्हणतात.