शहरी भागातील लसीकरण केंद्रांवर सुरूवातीच्या काळात मोठ्या रांगा लागत होत्या. पहिला डोस घेतलेल्यांची संख्या त्यामुळे वाढली देखील होती. परंतु दुसरा डोस घेण्यासाठीचा कालावधी किमान दोन ते तीन महिन्यांचा करण्यात आल्याने लसीकरण केंद्रांवर आता शुकशुकाट जाणवू लागला आहे. यामुळे लस घेणारे कमी आणि लसीकरण करण्यासाठी नियुक्त कर्मचारी जास्त अशी स्थिती नंदुरबारातील अनेक केंद्रावर दिसून येत आहे.
नंदुरबारात १० केंद्र
नंदुरबार शहरात लसीकरणासाठी एकुण १० केंद्र तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीला केवळ तीन केंद्र होते. त्यात जिल्हा रुग्णालय आणि जेपीएन व माळीवाडा नागरी आरोग्य केंद्राचा समावेश होता. त्यामुळे या केंद्रांवर लसीकरणासाठी मोठी गर्दी होत होती. ती बाब लक्षात घेता प्रशासनाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून ती १० पर्यंत नेली. त्यात शहरातील चारही भागात लसीकरण केंद्र करण्यात आले असून नागरिकांना आपल्या घरापासून जवळ केंद्र राहावे अशी सोय करण्यात आली.
पालिकेेचे सहकार्य
शहरातील लसीकरण केंद्रासाठी पालिकेने देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे. जागांची उपलब्धता, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, सोयीसुविधा पालिकेने पुरविल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला ते सोयीचे ठरले आहे.
याशिवाय पालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात लसीकरणासाठी जनजागृती देखील केली जात आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी लसीकरण वाढावे यासाठी त्या त्या भागातील नगरसेवकांना पुढाकार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जनजागृती करून ऑनलाईन नोंदणी करून दिली जात आहे. असे असले तरी नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे.
कर्मचारी बसून
शहरातील अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नियुक्त कर्मचारी अक्षरश: बसून राहत आहेत. एका केंद्रावर लस देणारी सिस्टर, ऑनलाईन नोंदणी करणारे तीन कर्मचारी, पडताळणी करणारा एक कर्मचारी असे पाच ते सहा कर्मचारी नियुक्त आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण करण्याची वेळ असते. पूर्वी जेथे रांगा लागत होत्या. रांगा लावण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रणासाठी सुरक्षा रक्षकांची मदत घेतली जात होती तेथे आता नुसताच शुकशुकाट दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभर काम नसताना बसून राहत असल्यामुळे कर्मचारी देखील कंटाळले आहेत.
विशेष म्हणजे अनेक विभागातील कर्मचाऱ्यांची लसीकरण केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे मुळ विभागातील काम देखील रेंगाळत जात आहे.
एका व्हायलमध्ये दहा जणांचे लसीकरण
लसीकरणाच्या एका व्हायलमध्ये दहा जणांचे लसीकरण केले जात असते. त्यामुळे किमान दहा जण झाल्याशिवाय काही ठिकाणी व्हायल फोडली जात नाही. तर काही ठिकाणी व्हायल फोडल्यानंतर ती सुरक्षीतपणे ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कसरत होते. त्यामुळे एक किंवा दोनजण लसीकरणासाठी आले तर त्यांना नजीकच्या दुसऱ्या केंद्रावर पाठविले जात आहे. लस ठेवण्यासाठी शितपेटीची गरज असते. त्यातील तापमान शून्य अंशापर्यंत टिकवून ठेवावे लागते. तरच त्या लसीचा प्रभाव टिकत असतो असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणने आहे.
दुसरा डोसचा कालावधी वाढला
पहिला डोस घेतल्यानंतर किमान तीन ते साडेतीन महिन्यानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस घेणाऱ्यांनी आधीच तो घेतला आहे. आता दुसऱ्या डोसचा कालावधी वाढविल्याने लसीकरण केंद्रांमध्ये शुकशुकाट वाढला आहे.
याशिवाय १८ ते ४४वयोगटातील लसीकरण देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळेही हा परिणाम दिसून येत आहे. आता दुसऱ्या डोसचा कालावधी वाढविण्यात आल्याने लसीकरण केंद्रातील शुकशुकाटपेक्षा १८ ते ४४ वयोटातील लोकांना लसीकरण सुरू करून वेळ भरून काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.