नंदुरबार : दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण जखमी झाल्याची घटना वावद (ता. नंदुरबार)नजीक घडली. मृत घोटाणे (ता. नंदुरबार), तर जखमी अमळनेर (जि. जळगाव) येथील आहेत. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश गोसावी, (वय ४०, रा. घोटाणे, ता. नंदुरबार) असे मृताचे नाव आहे, तर भीमरााव दंगल बोरसे, रवीना भीमराव बोरसे (रा. अमळनेर) व गिरीश रमेश चौधरी (रा. घोटाणे) अशी जखमींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, राकेश गोसावी हा आपल्या दुचाकीने (एमएच ३९-एस २४८३) जात असताना नंदुरबारकडून अमळनेरकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १९-एडी ७५९७) जबर धडक दिली. ओव्हरटेकच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातात स्वत: राकेश गोसावी यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर भीमराव बोरसे, रविना बोरसे आणि गिरीश चौधरी हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत भीमराव बोरसे यांनी फिर्याद दिल्याने मृत राकेश गोसावी यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार जितेंद्र जाधव करीत आहे.