लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. असे असले तरी गेल्या वर्षाप्रमाणेच शाळा बंद राहतील हे स्पष्टच आहे. असे असतानाही ऑनलाइन शिक्षणाचे ना कुठले व्हिजन ना नियोजन असल्याचे जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे यंदाही ग्रामीणसह आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात राहण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याची गुणवत्ता आणखी घसरून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
कोरोनामुळे गेली वर्षभर शाळा सुरूच झाल्या नाहीत. ऑनलाइन शिक्षण देण्याचा दावा केला गेला, तरी तो पूर्णत: फोल ठरला. त्यामुळे शिक्षणाच्या टप्प्यातील त्या वर्षाचा शिक्षणक्रमातील अभ्यासाला विद्यार्थी मुकले. त्याचा परिणाम पुढील शिक्षणात त्यांना भोगावा लागणार आहे. खाजगी शाळा व काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील सुशिक्षित आणि बऱ्यापैकी सधन असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी थोडेफार अभ्यासक्रम समजू शकले; परंतु ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपासून ऑनलाइन शिक्षण फारच दूरच राहिल्याचे वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. असे असतानाही येत्या शैक्षणिक वर्षासाठी किमान जिल्ह्यासाठी तथा आदिवासी दुर्गम भागासाठी काही व्हिजन ठेवले नाही ना काही नियोजन केले गेले. जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभाग आणि या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनाही उदासीनच राहिल्या.
गेल्या वर्षाचीच ‘री’ ओढणार?
कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक राहणार असल्याचाही अंदाज बांधला जात आहे. अशा स्थितीत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणे येत्या शैक्षणिक वर्षात तरी शक्य नाही. त्यातच १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले आहे. शाळा बंद असताना या शैक्षणिक वर्षात गेल्या वर्षाची ‘री’ ओढली जाईल हे स्पष्टच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान यंदाही निश्चित आहे.
पहिलीचे विद्यार्थी काय शिकले?
ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचा श्रीगणेशा गेल्या वर्षी केला त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी काहीही न शिकता दुसरीच्या वर्गात गेले आहेत. हे विद्यार्थी जसे पुढील शैक्षणिक वर्षाचा टप्पा गाठतील तसा त्यांना त्यांच्या अभ्यासक्रम काठिण्य पातळीवर जात राहील. परिणामी, असे विद्यार्थी मूळ शिक्षणालाच मुकलेले असतील हे स्पष्ट आहे.
वर्षभर काहीही हालचाली नाहीत
गेल्या वर्षी ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग जिल्ह्यात तरी फेल गेल्याचे सर्वश्रुत आहे. असे असताना येत्या शैक्षणिक वर्षात देखील शाळा बंद राहतील ही शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने काही व्हिजन का ठेवले नाही. नियोजन का केले गेले नाही? हा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.