कोळदा ते खेतिया महामार्ग रुंदीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात काम झाले असून दराफाट्यानजीक लहान पुलाचे काम, जमिनीचे सपाटीकरण, आवश्यक ठिकाणी भर टाकणे अशी कामे सध्या सुरू आहेत. महामार्गाचे काम वेगात सुरू आहे ही समाधानाची गोष्ट आहे. मात्र रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी लहान फरशी पुलाच्या कामासाठी खड्डा करण्यात आला आहे. तेथे मातीमिश्रीत रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना काम करणाऱ्या ठेकेदार किंवा महामार्गाचे काम करणारे अधिकाऱ्यांनी केलेली दिसत नाही.त्यामुळे याठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.
महामार्गावरील लहान पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी डायव्हर्शन म्हणून उभे केलेले फलक लांबून वाहनचालकाला दिसून येत नाहीत. तसेच काही ठिकाणी मातीच्या गोण्या भरून ठेवल्या आहेत तर काही गोण्या फाटल्याने त्यातील माती बाहेर पडल्याने त्या गोणी भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे उपाययोजना शून्य आहे तर काही ठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने रस्त्याच्या कडेला धोका वाढत आहे. रात्रीच्यावेळी महामार्गाच्या कडा वाहन चालकांना दिसण्यासाठी महामार्ग प्रशासन व ठेकेदार यांनी कोणतीही उपाययोजना केलेली नसून त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत आहे.
दरा फाट्यावर झालेले सपाटीकरण तर काही ठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, चर यामुळे जुन्या महामार्गाची कडा रात्रीच्यावेळी स्पष्ट दिसत नाही. ही कडा योग्य पध्दतीने दिसावी तसेच येथून जाणाऱ्या वाहनांचा सुरक्षित प्रवास घडावा यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी येथील ठेकेदाराबरोबर प्रशासनाचे अधिकारी उदासीन दिसत आहेत.
उपाययोजना नसल्याने वाहन चालकांचे हाल
महामार्गाच्या कडा वाहन चालकाला दिसाव्यात म्हणून लावण्यात आलेल्या मातीच्या गोण्या, रिफ्लेक्टर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिसत नाहीत. त्यामुळे महामार्ग कुठे संपतो हे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. येथे रात्रीच्यावेळी उजेडासाठी पथदिवे बसविण्याची गरज आहे.
रुंदीकरणसाठी सपाटीकरणाचे काम सुरू असताना जुन्या महामार्गाच्या कडेला काही ठिकाणी सिमेंट व मातीच्या गोण्या तर काही ठिकाणी ठेकेदाराने लाल रंगाचे स्टीकर लावून काट्या त्या मार्गाच्या कडेला उभ्या करून ठेवल्या आहेत. हे रिफ्लेक्टर होऊ शकतात का? असा प्रश्न पडतो.
महामार्गाच्या सपाटीकरणासाठी मातीची ने-आण करणाऱ्या डंपरचा हौदा कापडाने न झाकल्याने डंपरमधून मोठ्या प्रमाणात माती बाहेर उडते. इतर वाहन चालकांसह पादचाऱ्यांना यामुळे धोका निर्माण होत आहे.