यावेळी आमदार डॉ. गावित म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांतर्गत धरणातील गाळ काढण्याचा शासन प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांनीही आपल्या स्तरावर गाळ काढून शेतीत टाकण्याचे नियोजन करावे. पाटबंधारे विभागाची लवकरच बैठक घेऊन त्यात खापरखेडासह जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या दुरुस्तीसाठी अंदाज पत्रक तयार करून परिसरातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊन शेती पाणीदार करून हा परिसर सुजलाम् सुफलाम् करण्याचा आपला मानस आहे. शेतकरी सुखी, तर जग सुखी यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे, असे सांगितले.
शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी यांनी धरणाची दुरुस्ती व गाळ काढण्याबाबत माहिती दिली. १९७० मध्ये धरणाचे बांधकाम झाले असून, या धरणामुळे हजारो एकर शेती बागायत होत होती. परंतु, सद्य:स्थितीत धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे अत्यल्प पाणीसाठा असल्याने पुरेसे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून पाटबंधारे विभागाकडून या धरणाची दुरुस्ती करण्यात येऊन शासकीय यंत्रणेकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने माळी यांनी केली. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता सचिन शिंदे व शाखा अभियंता भदाणे यांनी खापरखेडा धरणाबाबत माहिती दिली.
कायमस्वरूपी पाणीपुरवठा व
संरक्षण भिंतीची मागणी
खापरखेडा हे १०० टक्के आदिवासी लोकवस्तीचे गाव असून, या गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन व्हावे. तसेच खापरखेडा धरणातून सँडवलद्वारे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे भगदाड पडल्याने त्याला संरक्षण भिंत बांधणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत तत्काळ ग्रामसभेचा ठराव करून प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना डॉ. गावित यांनी ग्रामस्थांसह ग्रामसेवकास दिल्या.
डॉ. कांतीलाल टाटीया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी, उपसरपंच दिगंबर माळी. ग्रा. पं. सदस्य देवराम माळी, दीपक माळी, राकेश माळी, फेसचे माजी सरपंच मणिलाल पाटील, हिंगणीचे माजी सरपंच सुनील पाटील, खापरखेडाचे सरपंच देवा भिल, उपसरपंच जिजाबराव भिल, ग्रामसेवक प्रदीप पाटील, आदींसह जयनगर, वडाळी, कोंढावळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते. गोरख वाल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर राकेश माळी यांनी आभार मानले.
केटीवेअर बंधाऱ्यांची पाहणी
कोंढावळ व खापरखेडा परिसरातील लघुसिंचन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग स्थानिक स्तर या विविध विभागांमार्फत लाखो रुपये खर्च करून रंगूमती नदीवर केटीवेअर बंधारे गेल्या वर्षीच बांधण्यात आले आहेत. मात्र, ही कामे संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार न झाल्याने बंधाऱ्यांना भगदाड पडून गळती लागल्याने साचलेले पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी देत तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी संतप्त होत निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.