या वेळी अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एम. पथाडे, न्याय.आर.ए. शिंदे, न्याय.व्ही.एन. मोरे, न्याय.ऐ.आर. शेंडगे, न्याय.ऐ.आर. कल्लापुरे, न्याय.डी.व्ही. डेडीया यांच्यासह प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सचिन पगारे, वीज कंपनीचे अभियंता सुजित पाटील यांच्यासह वकिल संघाचे अध्यक्ष राजेश कुलकर्णी, सुवर्णसिंग गिरासे, समीर टाटीया, ई.जी. पाठक, वाय.एस. देशले, जे.एन. संचेती, ऐ.डी. गुलाले, सरजू चव्हाण, डी.एस. पटेल, अनिल सराफ, वाय.एस. ईसी, सी.एम. संचेती, व्ही.सी. पथाराया, डी.एम. रावल आदींनी परिस्थितीची पाहणी करत अधिकाऱ्यांशी चर्चा करून भविष्यात पुन्हा अशी समस्या उद्भवू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली.
पालिका प्रशासनातर्फे न्यायालयासमोरील पाटचारीतील गाळ व पाईप जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी सकाळी काढण्यात आला. त्याचप्रमाणे पाटचारीचे रुंदीकरण करण्यात आले. पाटचारी मोकळी झाल्याने सायंकाळपर्यंत बऱ्याच प्रमाणात पाणी वाहून गेल्याने डोंगरगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
पाटचारीद्वारे शहरातून जाणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने पाटाचे पाणी न्यायालय आवारात शिरते. यापूर्वीही सन २०१९-२० या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत पाणी न्यायालयाच्या परिसरात तसेच इमारतीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात फायलींचे नुकसान झाले होते. त्यावर्षीचा पूर्वानुभव लक्षात घेता इमारतीतील कपाटात, खालच्या कप्प्यात ठेवलेल्या फाईली संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी वर ठेवल्याने अधिक नुकसान झाले नाही. मात्र, वारंवार पाणी न्यायालयीन इमारतीत शिरत असल्याने कामकाजावर त्याचा परिणाम होतो. यापुढे न्यायालयीन इमारतीत पाणी शिरून नुकसान होऊ नये यासाठी संबंधितांनी दखल घेऊन तीन मजली सुसज्ज इमारत या परिसरात बांधावी. त्या दरम्यान पावसाचे पाणी न्यायालयीन आवारात शिरुन नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावा. - ॲड.राजेश कुलकर्णी, अध्यक्ष, अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशन, शहादा.