नंदुरबार : कोरोना काळात शहरी व ग्रामीण भागात मुलांमधील पोषणाच्या प्रमाणात तफावत आढळून आली. ग्रामीण भागात कुपोषण वाढले तर शहरी भागातील मुलांमधील पोषण वाढून त्यांच्यातील स्थूलता वाढल्याचे दिसून आले. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ही बाब समोर आली.
लॅाकडाऊन व कोरोना काळात वेळेवर पोषण आहार न पोहचणे, पुरेसा आहार न भेटणे यामुळे ग्रामीण भागात विशेषत: सातपुड्यातील दुर्गम भागात कुपोषणाचे प्रमाण वाढले होते. आकडेवारीतूनही ते समोर आले होते. कुपोषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. शहरी भागात मुलांची स्थूलता कमी करण्यासाठी मात्र पालकांचे टेन्शन वाढल्याचे चित्र आहे.
कारणे काय?
n शहरी भागात कोरोना काळात मुले बाहेर निघाली नाहीत, मैदानी खेळ खेळले नाहीत, घरात बसून राहण्यामुळे स्थूलता वाढली.
n शाळांनी देखील ऑनलाइन वर्ग सुरू केले. त्यामुळे मुलं सलग काही तास मोबाइल, लॅपटॅापसमोर बसून राहिली त्यामुळेही स्थूलतेची समस्या पुढे आली आहे.
n फास्टफूडचे अतिसेवन सद्या वाढत चालले आहे. त्यामुळे मुलांमधील वजन वाढल्याने त्यांना आजारांची भीती आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात...
मुलांना मुक्तपणे खेळू द्या, सतत अभ्यास आणि टीव्हीसमोर बसून राहू देऊ नका. जेवढा त्यांचा शारीरिक व्यायाम होईल, शारीरिक हालचाल होईल तेवढे त्यांचे पोषण होऊन शरीर निरोगी राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सद्या मुलं मैदानी खेळ विसरले आहेत. आपल्या परिसरात, कॉलनीत मोकळे मैदान असेल तर अशा ठिकाणी मुलांना आवर्जून खेळण्यासाठी पाठवा. सकाळी किंवा सायंकाळी आपल्यासोबत फिरण्यास घेऊन जाऊ शकता. घरातल्या घरात प्राणायाम, योगासने करण्याची सवय त्यांना लावा. यामुळे शारीरिक हालचाली होतील आणि त्यांच्यातील स्थूलता कमी होईल, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात योग्य पोषण आहार भेटला नाही, आरोग्य सुविधा वेळेवर पोहचल्या नाहीत. त्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढली. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. पोषण पुनर्वसन केंद्रात बालकाला ठेवले होते. आता त्यात सुधारणा होत आहे.
-एक पालक, अक्कलकुवा तालुका.
कोरोना काळात मुलाचे वजन वाढले, स्थूलता वाढली. वारंवार टीव्हीसमोर बसणे, अभ्यासासाठी लॅपटॅापसमोर बसणे यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत. -एक पालक, नंदुरबार.
n स्थूल शरीर असलेल्या मुलांना काही व्याधी लागण्याची शक्यता असते. लहान वयात व्याधी लागल्या तर आयुष्यभर त्यापासून सुटकारा मिळणे कठीण असते.
n गेल्या काही वर्षात शहरी भागातील मुलांच्या स्थूलतेबाबतची समस्या वाढू लागली आहे. यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.