नंदुरबार : शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील उपहारगृह, दुकाने, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योग सेंटर, सलून, इनडोअर स्पोट्र्स व आस्थापना सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
खुली अथवा बंदिस्त उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु उपाहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील. उपाहारगृह व बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था आवश्यक राहील. पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा असेल.
सर्व व्यापारी दुकाने, शॉपिंग मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम, व्यायामशाळा, योग सेंटर, सलून-स्पा, केशकर्तनालय, ब्युटी पार्लर्स हे ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील. दुकाने, शॉपिग मॉल्स, इनडोअर स्पोर्ट्स या ठिकाणी खेळाडू, तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. याठिकाणी खेळाडूंना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळासाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत खेळण्यास मुभा असेल.
सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व नगरपालिका कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे लसीकरण पूर्ण झालेले असलेल्या खासगी व औद्योगिक आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा असेल.
मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे सर्व नियमित वेळेत सुरू राहतील. खुल्या प्रांगणातील, लॉन किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यास संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल, या अटीवर मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण,लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील.
विवाह सोहळ्यात कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहील. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई करण्यात येऊन संबंधित हॉटेल, मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात येईल. मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, छायाचित्रकार अशा विवाह व्यवस्थेशी संबंधितांचे लसीकरण पूर्ण होऊन १४ दिवस झालेले असावे. त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.
सर्व सिनेमा हॉल, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स (स्वतंत्र किंवा मॉल्समधील ) सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे पुढील आदेश होईपावेतो बंद राहतील. वाढदिवस, संमेलन, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, निवडणुका प्रचार सभा, रॅली, मिरवणुका, मोर्चे अशा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध असेल.
निर्बंधातून सूट देण्यात आलेली सर्व दुकाने, कार्यालय, औद्योगिक आस्थापना, शॉपिग सेंटर, मॉल, आणि उपाहारगृहे, बार मालक, व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी, लसीकरणाची माहिती, प्रमाणपत्रासह तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी. तसेच दुकाने, उपाहारगृहे, बार, मॉल्स, कार्यालये, औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालिक निर्जंतुकीकरण व सॅनिटायझेशन, ग्राहकांचे तापमान घेण्याची तसेच मास्क डिस्पेंसर व बायोमेडिकल वेस्ट जमा करण्याची जबाबदारी संबंधित मालकाची व व्यवस्थापनाची असेल.