सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या ११ वासहतींपैकी एकट्या तळोदा तालुक्यात सात वसाहती आहेत. या वसाहती सन १९९५ साली स्थापन झाल्या आहेत. सुरुवातीस पाच वर्षे नर्मदा विकास विभागाकडे असलेल्या या ग्रामपंचायती सन २०००मध्ये जिल्हा परिषदेच्या ताब्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सध्या त्यातील नर्मदानगर, सरदारनगर, रेवानगर, रोझव पुनर्वसन, अशा चार ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर राणीपूर, बंधारा व पाढळपूर या तीन ग्रामपंचायतींचादेखील निवडणूक सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी फारसे प्रयत्न न झाल्यामुळे तब्बल १३४ जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. साहजिकच हौशे-नवशेदेखील आपले भाग्य आजमावत आहेत. सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्पास सुरुवात केली आहे.
शेतीची कामे सुरू असल्यामुळे सर्व मजूर मतदार कामासाठी सकाळी लवकरच शेतात निघून जात असल्याने उमेदवारांची अक्षरशः दमछाक झाली आहे. मजूर सायंकळी घरी परत आल्या नंतर उमेदवारही तेव्हाच प्रचार करत असतात. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या नसल्यामुळे उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटी गाठीवरच अधिक भर दिला आहे. सर्वच ठिकाणी उमेदवारांनी मतदारांना शासनाचे घरकुल, शौचालय, संजय गांधी योजना, आदिवासी विकास विभागाच्या योजना व गावातील विकासकामे यावर जोर दिला आहे. यातून मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातही रेवनगर, सरदारनगर, नर्मदा नगर व रोझवा पुनर्वसन या प्रकल्पग्रस्तांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकासाच्या ऐवजी वेगळेच प्रचाराची मुद्दे उमेदवार यांनी बनविले आहेत. या ठिकाणी सर्वच उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या सिंचन सुविधा व वीज कनेक्शनचा मुद्दा प्रमुख बनविला आहे. या मुद्द्याभोवतीच तेथील निवडणूक रंगली आहे. कारण या चारही वसाहतींमधील शेतकरी मतदार आहेत. ते आपल्या शेतातील सिंचन सुविधांबाबत आजही उपेक्षित आहेत. वसाहती स्थापन होऊन २० ते २५ वर्षे झालीत. अजूनदेखील त्यांना आपल्या शेतात पुरेशी सिंचनाची सुविधा नाही. ज्यांनी खासगी पैशातून कृषिपंप केले आहे. त्यांना अद्याप तागायत पैसे भेटली नाहीत. उधार, उसनावरीन व सावाकराकडून पैसे घेऊन कृषिपंप बसविला आहे. शिवाय बहुसंख्य शेतकरींना वीज कनेक्शन दिलेले नाही. त्यासाठी ते सतत संबंधित अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारत आहेत. अजूनही त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. नेमके उमेदवारांनी हाच धागा पकडून प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविला आहे. साहजिकच प्रकल्पधारकांच्या या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातही विद्यमान सरपंच, उपसरपंच याच्या पॅनलविरोधात माजी पदाधिकाऱ्यांनी शड्डू ठोकल्यामुळे ग्रामपंचायतींची निवडणूक अतिशय चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चारही ठिकाणी मुख्यतः काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये सामना आहे. येथे १४ प्रभागांतून साधारण ४० जागा आहेत. तब्बल ९२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नर्मदानगर व रेवानगर या ग्रामपंचायतीत प्रत्येकी ११ जागा, तर सरदारनगर आणि रोजवे येथे प्रत्येकी नऊ जागा आहेत.
नेत्यांच्या सभाची उत्सुकता
तळोदा तालुक्यातील या सात ग्रामपंचायतींमधील उमेदवारांनी आता पावेतो आपापल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या वैयक्तिक भेटी गाठीवर भर दिला आहे. त्यांनी प्रचाराचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्याला सुरुवातदेखील केली आहे. परंतु अजूनही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांना सुरुवात केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारण मतदारांना सुद्धा सभांची उत्सुकता लागली असल्याचे उमेदवार सांगतात. गावांमध्ये पायाभूत सुविधांचा प्रश्न असला तरी त्यांच्या सिंचनाच्या प्रश्नदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. शिवाय हा प्रश्न वरिष्ठ नेत्यांशिवाय सोडवला जाऊ शकत नाही. त्यामुळे हा मुद्दा मतदारांना तेच पटवून देऊ शकतात. साहजिकच नेत्यांच्या सभा गावात होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु नेत्यांच्या सभांबाबत अजूनही कार्यकर्त्यांनी पाहिजे तसा प्रतिसाद न दिल्यामुळे उमेदवरांनी त्यांच्या भूमिकेविषयी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.