गेल्या गुरुवारी रात्री तळोदा तालुक्यातील नर्मदानगर, सरदारनगर, वाल्हेरी या परिसरात वादळी वाऱ्यासह दमदार अवकाळी पाऊस झाला होता. दुसऱ्या दिवशीही संपूर्ण तालुक्यात सलग दोन दिवस पाऊस पडला. यात रब्बी ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना फटका बसला होता. त्यातही नर्मदानगर, सरदारनगर, वाल्हेरी व रेटपदा येथील रब्बी ज्वारी अर्थात दादर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे पीक अक्षरशः भुईसपाट झाले होते. बहुतेक शेतकऱ्यांचे पीक परिपक्व झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षाबरोबरच यंदाही अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत तक्रारी केल्यानंतर महसूल व तालुका कृषी कार्यालयाने युद्धपातळीवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत. साधारण २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून तातडीने पुढील कार्यवाहीसाठी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवणार असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात जवळपास २५० शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. सर्वांत जास्त नुकसान तालुक्यातील नर्मदानगर या सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांचे झाले आहे. मोठ्या मेहनतीने त्यांनी कष्ट करून दादर पीक वाढवले होते. ते परिपक्वदेखील झाले होते. परंतु अस्मानी संकटाने तेही हिरावून नेले. साहजिकच आम्ही शेतकरी अक्षरशः कर्जबाजारी झाल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखवली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला होता. थोडीफार रब्बीवर आशा होती तीही धुळीस मिळाली आहे. निदान शासनाने तरी या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी त्यांची मागणी आहे.
तळोदा तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून प्रशासनास अहवाल सादर करण्यात येईल.
- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, तळोदा.
वादळी पावसामुळे माझ्या दादर पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. झालेला खर्चदेखील निघणार नाही. घेतलेले कर्ज कसे फिटणार या चिंतेत आहे. तलाठी व कृषी कर्मचारी शेतावर आले होते. ते केवळ पाहणी करून गेले. अजून पंचनामा बाकी आहे.
-चांद्या पाडवी, शेतकरी, नर्मदानगर, ता. तळोदा.