कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर केल्याने शहादा आगाराची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. ३१ मेपर्यंत वाहतूक बंद असल्याने या दोन महिन्यांच्या कालावधीत एकही फेरी झालेली नाही. राज्य शासनाने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर १ जूनपासून जिल्हाअंतर्गत धडगाव व नंदुरबार अशा दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर ३ जूनपासून जिल्ह्याबाहेर साधारण २५० किलोमीटर अंतरावरील शिरपूर, धुळे व नाशिक अशा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
सोमवार, ७ जूनपासून जळगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई अशा लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत जिल्हाअंतर्गत व जिल्ह्याबाहेर बससेवा सुरू असली, तरी एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ २० कर्मचारी सद्यस्थितीत कार्यरत असून, दररोजच्या नियमित १०० पैकी फक्त १० शेड्युल कार्यरत आहेत. ज्या प्रमाणात बसफेऱ्या वाढविल्या जातील, त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
लॉकडाऊनपूर्वी शहादा आगारातून दररोज ७०० फेऱ्या होत होत्या. यातून ३२ हजार किलोमीटर प्रवास होऊन सुमारे नऊ ते दहा लाख रुपये दररोज उत्पन्न मिळत होते. एप्रिल व मे हे दोन महिने लग्नसराई व विविध देवस्थानातील यात्रा-उत्सवाचे दिवस असल्याने या दोन महिन्यात शहादा आगाराला सर्वाधिक उत्पन्न मिळत होते. मात्र सलग दुसऱ्यावर्षी एप्रिल व मे असे दोन महिने लॉकडाऊन असल्याने शहादा आगाराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यावर्षी चैत्र महिन्यातील सप्तशृंगी गडावरील यात्रा, त्याचप्रमाणे तोरणमाळ व देवमोगरा येथील यात्रा रद्द झाल्याने याचा फटका शहादा आगाराला बसला. इंधनाची प्रचंड प्रमाणात दरवाढ झाली असली, तरी राज्य परिवहन महामंडळातर्फे कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नसून, यापूर्वीच्या भाड्यात प्रवासी वाहतूक सुरू राहणार आहे.