बामखेडा : गेल्या दीड महिन्यापासून उघडीप दिलेल्या पावसाने आता कुठे रिमझिम पावसाला सुरुवात केली आहे. या पडलेल्या रिमझिम पावसामुळे करपून चाललेल्या पिकांना काही अंशी हलकासा आधार मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहादा तालुक्यात पावसाचा खंड पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती राहीली तर दिवसें-दिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तालुक्यातील सुसरी धरण, दरा प्रकल्प तसेच लहान-मोठे तलाव, केटीवेयर बंधारे, जलस्वराज्य प्रकल्प आदी अद्यापही कोरडेठाकच आहेत. त्यामुळे पावसाळा संपत आला तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शहादा तालुक्यामध्ये कापूस, तुर, सोयाबीन, उडीद, पपई, केळी, मिरची यासह शेतकऱ्यांनी आदी प्रमुख पिके घेतली आहे. पीक मोठ्या जोमात आलेले आसाताना मागील आठवड्यात पावसाने काही अंशी हजेरी लावली. चांगला पाऊस बरसेल अशी आशा असताना परत हुलकावणी दिल्याने ऐन बहरात आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा पुरता धुराळा उडाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता कुठे दोन दिवसांपूर्वी तुरळक प्रमाणात रिमझिम पाऊस झाल्याने थोड्या प्रमाणात पिकांना जीवनदान मिळाले आहे. हवामान विभागाने यावर्षी गतवर्षीप्रमाणेच पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाला सुरुवात झाली होती. वेळेवर व चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड केली. पीक उगवणीवर आल्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर दुबार पेरणीचे संकट ओढवले, तरीही बळीराजाला अपेक्षा होती की, पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात खत पेरून फवारणी केली. परंतु मध्यंतरी दीड महिन्यापासून तालुक्यातून पाऊस गायब झाल्याने हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावू लागला आहे. गेल्या आठवड्यात गत दोन-तीन दिवसामध्ये कुठे रिमझिम तर कुठे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या होत्या. यामुळे मूग, उडीद सोडता इतर पिकांना हलकासा आधार झाला आहे. त्यातच या आठवड्यात कडक ऊन पडल्याने जमिनीतील ओलावा हा कमी होत आहे. तर नदी, नाले, तलाव हे अद्यापही कोरडेठाकच आहेत. त्यामुळे शेतकरी हे अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे.
गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवस पाऊस झाल्याने कापूस व इतर पिकांना थोडाफार आधार झाला आहे. मूग, उडीद हे गेल्यात जमा आहे. त्यातच ऊन हे कडक पडू लागल्याने ओलावा हा कमी होत आहे. जोरदार पावसाअभावी नदी-तलाव भरले नाहीत. परिणामी विहिरी व कूपनलिका आता तळ गाठू लागल्या आहेत. जोरदार पाऊस नाही झाला तर हाताशी आलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान होऊन भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. - सुहास चौधरी, शेतकरी, बामखेडा