त्यामुळे संबंधित विभागाने घरोघरी जाऊन रुग्णाची तपासणी करीत औषधोपचार करावा, अशी मागणी होत आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे हिवताप व कीटकजन्य आजाराची साथ पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी व कोणकोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
हिवताप हा सर्वांत जास्त पसरणारा आजार असून, या आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीपासून होतो. ही मादी स्वच्छ साचलेल्या पाण्यावर अंडी घालते. जसे घराच्या छतावरील मडकी, टाकून दिलेले टायर्स, कप, साचलेले डबके, आदी.
लक्षणे
रुग्णास कडाडून थंडी वाजणे, थंडीनंतर रुग्णास १०२ ते १०५ डेंग्री सेल्सिअसपर्यंत ताप येणे, डोके दुखणे, रुग्ण अर्धवट शुद्धी किंवा बेशुद्ध होणे, ठराविक कालावधीनंतर ताप चढणे किंवा पुन्हा उतरणे.
डेंग्यू ताप
डेंग्यू ताप या आजाराची लागण एडीस इजिप्तिस नावाच्या डासाच्या मादीमार्फत होते. हे डास ओळखण्यासाठी त्याचा काळा रंग व त्याच्या पायावरील पांढरे पट्टे लक्ष वेधून घेतात.
लक्षणे
डोके दुखी, थंडी वाजून ताप येणे, तीव्र सांधे व पाठदुखी, रुग्णास हालचाल करणे अशक्य होणे, क्वचितप्रसंगी रुग्णास ताप येऊन रुग्णाच्या नाका-तोंडाद्वारे रक्त येणे, रुग्ण बेशुद्ध होणे.
चिकुनगुण्या
या आजाराचा प्रसार एडिस इजिप्त नावाच्या डासामार्फत होतो. या डासाची उत्पती स्वच्छ व साठविलेल्या पाण्यात होते.
लक्षणे
ताप येणे, डोके दुखणे, उलट्या व मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी हे प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार सर्व वयोगटात आढळून येतो.
वरील सर्व कीटकजन्य आजाराचे कारण आपल्या घराभोवतालची अस्वच्छता होय. त्यासाठी साधे व सोपे उपाय केल्यास भयंकर आजारापासून आपला बचाव निश्चित होऊ शकतो.
आजार होऊ नये म्हणून खालील उपाय योजना राबविणे गरजेचे आहे.
आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका, घरातील सर्व साठवलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करा. या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरडा करून पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत.
अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत, त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी.
झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावे. पांघरून घेऊन झोपावे. संध्याकाळी सहा ते आठ दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा.
घराच्या छतावरील फुटके डबे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी, आदींची वेळीच विल्हेवाट लावा.
संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी असावा.
दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकऊ ऑईल टाकावे.
कीटकजन्य आजार उद्भवू नये म्हणून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. उपरोक्त लक्षणे अथवा आजार झाल्यास सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन सल्ला घ्यावा अथवा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे व पाणी उकळून प्यावे. - मनीषा गरूड, सरपंच, तोरखेडा