महाराणा प्रताप यांच्या भगिनी अक्काराणी यांच्या वास्तव्याचे दाखले देण्यात येणाऱ्या अक्राणी महालाची निर्मिती १७ व्या शतकात काठीचे संस्थानिक राणा गुमानसिंग यांनी हा किल्ला बांधला असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. राजस्थानातून १७ व्या शतकात आश्रयास आलेल्या राजपूत योद्धांनी हा किल्ला बांधला असल्याचा दावा ब्रिटिश इतिहासकारांनी केला आहे. अनेकविध दावे आणि प्रतिदावे असले तरीही राजस्थानी बनावट असलेला हा किल्ला बांधकामाचा अजोड असा नमुना आहे. सातपुड्याच्या डोंगरामध्ये संपूर्ण विटांनी केलेले बांधकाम लक्षवेधी आणि प्रगत अशा विचारांचे आहे. तीन दिशेला भिंती आणि भक्कम अशा तटबंदी यातून शत्रूची बांधबंदिस्ती करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. पुरातन बारव आणि दगडात कोरलेले एक राणीकाजल मातेचे मंदिरही येथे आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूला केलिपाणी, बेडवाई (विहिरीमाळ) ही गावे आहेत.
ऐतिहासिक महत्त्व
१६३४ मध्ये शहाजहानने अक्राणी महाल हे संस्थान म्हणून घोषित केल्याची नोंद धुळे गॅझेटमध्ये आहे.
महाराणा प्रताप यांच्या भगिनी अक्करानी यांचे येथे वास्तव्य राहिल्याचे दाखले दिले जातात यामुळे या परिसराला अक्राणी असे नाव पडले.
या परिसरात इतिहासाच्या खाणाखुणा,नाणी सापडत आहेत.
येथील राणी काजल माता राजस्थान व महाराष्ट्रातील राजपूत समाज बांधवांची कुलदैवत असल्याचे सांगण्यात येते.
डागडुजी व दुरुस्तीची आजवर प्रतीक्षा
संपूर्ण विटांचे बांधकाम असलेल्या महालांच्या भिंती दिवसेंदिवस अधिक जीर्ण होत आहेत. किल्ल्याचे संवर्धन न झाल्यास लवकरच या भिंती नष्ट होणार आहेत. पर्यटक म्हणून येणारे सोबतचा कचराही येथेच टाकत असल्याने वास्तू खराब होत आहे. प्रशासनाने लक्ष दिल्यास हा ऐतिहासिक ठेवा जपला जाणार आहे.
पुरातत्त्व विभागाला विसर
सातपुड्याच्या डोंगराळ भागात निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या अक्राणी महाल किल्ल्याचा पुरातत्त्व विभागाला विसर पडला आहे असे दिसून येत आहे. येथे आजवर कोणत्याच अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
या किल्ल्याचे पुरातत्त्व विभागाने जतन करणे आवश्यक आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक येथे लावण्याची अत्यंत गरज आहे. किल्ल्यात समाधी आहेत त्यांचे संवर्धन होण्याची गरज असल्याची माहिती बेडवाई, ता. तळोदा येथील राकेश पटले यांनी दिली.