नवापूर तालुक्यातील विजापूर गावात तीन बैलांवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. तालुक्यातील रायपूर, चौकी, नागझरी, विजापूर, नांदवण, भरडू अशा गावांमध्ये देखील लिम्पी स्किन रोगाचे थैमान वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली असता देखील विजापूर गावाचा नदी फळीत अजूनही पशुवैद्यकीय अधिकारी पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही शेतकऱ्यांनी खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार व लसीकरण करून घेतले आहे, परंतु शासकीय यंत्रणेची उदासीनता दिसून येत आहे.
विजापूर गावातील शेतकरी दिनेश भीमसिंग गावित, सुरुपान रामजी गावित यांच्या बैलांवर आजार आला आहे. त्यांनी खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून लसीकरण करून घेतले.
पशुधन आधीच कमी होत असले तरी आजही ग्रामीण भागात जनावरांची संख्या चांगली आहे.नवापूर तालुक्यातील बहुतांशी भागात लिम्पी स्किन आजाराने थैमान घातले आहे. जनावरांच्या दूध उत्पादनावरही याचा परिणाम होत आहे. खरीप हंगामाच्या दिवसांत गुरांना झालेली ही बाधा शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागत असून नाइलाजाने अनेकांना यांत्रिकी शेतीचा आधार घेऊन पैसे खर्च करावे लागत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी पशुधन विभाग मात्र अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे गुरांना उपचार करण्यास विलंब लावत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
या आजारात जनावरांना ताप येतो. जनावरांच्या पूर्ण शरीरावर गाठी येतात. सुखद बाब म्हणजे या आजारात जनावर दगावण्याची शक्यता नसते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
असा होतो लिम्पी स्किन आजार
जनावरांच्या शरीरावर गाठ येणे, ताप येणे, चारा न खाणे, नाक व डोळ्यातून पाणी येणे यासारखी लक्षणे दिसून लिम्पी स्किन या विषाणूजन्य आजाराची मोठ्या प्रमाणात जनावरांना लागण झाली आहे.
इतर जनावरांना लांब ठेवावे
लिम्पी स्किन या आजाराची लागण झालेल्या जनावरांना दुसऱ्या जनावरांपासून लांब ठेवावे, शेतकऱ्याने देखील हात स्वच्छ साबणाने धुवावेत, पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
गुजरात राज्यातून आजाराची लागण
जनावरांमध्ये लिम्पी स्किन हा आजार नंदुरबार जिल्ह्यात गुजरात राज्यातील वलसाड, डांग जिल्ह्यातून आला आहे. यावर कुठलेही औषध नाही. लसीकरण केले जाते तसेच काही देशी इलाज देखील केला जात आहे. नवापूर तालुक्यात याचा प्रादुर्भाव वाढला आहे,अशी माहिती सेवानिवृत्त पशुधन निरीक्षक शरद चौधरी यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी नॉटरिचेबल
लंपी स्किन या आजाराबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नवापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता मोबाईल स्विच ऑफ दिसून आला.
आमच्याकडे डॉक्टर आलेच नाही
विजापूर गावात गुरांवर आजार आल्याने नवापूर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता परंतु आमच्या गावात कुठलेही लसीकरण करण्यात आले नाही. दुसऱ्या पाड्यात डॉक्टरांनी लसीकरण केले; परंतु आमच्या पाड्यात डॉक्टर आलेच नाही त्यामुळे रविवारी खासगी डॉक्टरांना बोलावून लसीकरण करून घेतले.
राजेश गावित, शेतकरी, विजापूर नदीफळी,