कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी ज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे, त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता मुस्लीम बांधवांनी घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावीत. नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी.सध्या लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चेन’चे ४ जूनच्या आदेशानुसार आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सर्व निर्बंध कायम लागू राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, पोलीस, स्थानिक प्रशासन यांच्या आदेशांचे पालन करावे, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.