लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह शहादा, चिंचपाडा व खांडबारा येथे नायलॅान मांजा विक्री करणा-यांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. तसेच २२ हजारांचा मांजाही जप्त करण्यात आला आहे.नंदुरबार शहरातील जुने पोस्ट ॲाफीस भागात आनंद गोपाल जयस्वाल हे नॅायलाॅन मांजा विक्री करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून १० हजार १३० रुपयांचा मांजा जप्त केला. तसेच कोरीट नाका परिसरात सोनू उर्फ पंकज कैलास निकुंभ हे देखील नॅायलॅान मांजा विक्री करीत असतांना त्यांच्याकडून साडे चार हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी राहुल पांढारकर व अभय राजपूत यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथे भोई गल्ली परिसरात सुनील अशोक वाडीले यांच्याकडे विक्रीसाठी असलेले दोन हजार ७०० रुपयांचा नॅायलॅान मांजा आढळून आला. पोलीस कर्मचारी शोएबशेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.चिंचपाडा, ता.शहादा येथे चेतन रमेश परदेशी हे बाजार परिसरात नॅायलॅान मांजा विक्री करीत होते. त्यांच्याकडून चार हजार ५६० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी जितेंद्र सोनवणे यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. खांडबारा येथे मुख्य बाजारात अलतमाश रफीक मेमन हा मांजा विक्री करतांना आढळून आला. त्याच्याकडून दोन हजार ३०० रुपयांचा नॅायलॅान मांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी राजेंद्र काटके यांनी फिर्याद दिल्याने विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नॅायलॅान मांजा विक्री करण्यास शासनाने प्रतिबंध केला असून तो विक्री करू नये. विक्री करतांना आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
नॅायलॅान मांजा विक्री प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:10 IST