पपई, केळी, ऊस, कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी या पिकांची योग्यप्रकारे वाढ होण्यासाठी युरिया खताची आवश्यकता असते. या पिकांना योग्यवेळी खते देण्यासाठी शेतकरी विक्रेत्यांकडे फिरत आहे. युरिया हवा असेल तर इतर विद्राव्य खतांची सक्ती केली जात आहे. केवळ युरिया हवा असेल तर विविध कारणे सांगितली जात आहेत. युरिया खत मिळवणे शेतकऱ्यांसाठी अवघड झाले असून दुकानदारांचे हातपाय पडण्याची वेळ आली आहे. ठरावीक कंपनीचे युरिया खत बाजारात उपलब्ध असून युरियाबरोबर इतर खत घेण्याची अट दुकानदारांकडून घातली जात आहे. प्रत्येकवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामात खतांच्या किमती वाढवल्या जातात. ऐन हंगामात युरिया खताचा डोस पिकांना मिळाला नाही तर पिकांची वाढ खुंटून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कितीही पैसे घेऊन युरिया द्या, अशी मागणी शेतकरी कृषी दुकानदारांकडे करीत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालू खरीप हंगाम हा एवढाच आशेचा किरण शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून युरिया खताच्या टंचाईबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
युरियाच्या टंचाईने शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST