प्रधानमंत्री पीकविमा योजनेत प्रकाशा येथील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यात सोयाबीन, कापूस, ज्वारी (दादर), मका, मूग, उडीद आदी पिकांचा पीकविमा काढला होता. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे संबंधित कंपनीच्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी पीक खराब झाले, शेतात पाण्याचे डबके साचले त्या भागात जाऊन ऑनलाइन फोटो काढले व पंचनामे केले होते. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पंचनामे करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्याची पोहोच पावतीही शेतकऱ्यांकडे आहे. पंचनामे करून चार महिने झाले. मात्र अद्यापही संबंधित शेतकर्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. कृषी विभागाने याबाबत दखल घेऊन ज्या कंपनीने विमा काढला आहे त्यांना योग्य त्या सूचना देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही काही शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. मात्र खरीप हंगामामध्ये नुकसान होऊनही त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. आता तर रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी ( दादर) या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीकविमा कंपनी व राष्ट्रीयीकृत बँकांनी नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची रक्कम देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.