जयनगर : गेल्यावर्षी मिरचीच्या पिकावर असाध्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता. मात्र यावर्षी शहादा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. सध्या मिरचीचे पीक चांगले असले तरी खर्चाच्या मानाने हिरवी मिरची बाजारात केवळ सात ते आठ रुपये किलोने विकली जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यात उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. एकंदरीत भाव पडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
सुरुवातीला २५ ते ३० रुपये किलोने विकली जाणारी हिरवी मिरची बाजारात सध्या सात ते आठ रुपये किलोने विकली जात आहे. हिरव्या मिरचीचे भाव गडगडल्याने मिरची लावणीपासून ते उत्पादन निघेपर्यंत मजुरीचा खर्च, फवारणीचा खर्च, मल्चिंग पेपरचा खर्च, वजन पेलण्यासाठी उभे केलेल्या बांबूंचा खर्च तसेच मशागतीचा खर्च निघेनासा झाला आहे. त्यामुळे मिरची पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांना फाटा देत मिरचीची लागवड केली आहे. मागील वर्षी तालुक्यातील जयनगरसह परिसरातील शेतकऱ्यांच्या मिरची पिकावर असाध्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना उत्पन्न निघण्याच्या अगोदर मिरचीचे पीक वखरणी करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मिरचीसाठी लावलेले भांडवलही निघाले नव्हते. फक्त शहादा तालुक्यात लोंढरे या गावामध्ये पाच ते सहा शेतकऱ्यांना मिरची पिकामधून लाखो रुपयांचे उत्पन्न निघाले होते. त्यामुळे त्या गावाला परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी भेटी देऊन त्या शेतकऱ्यांप्रमाणे यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मिरची पिकावर औषध फवारणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्यातील सगळ्याच शेतकऱ्यांचे मिरची पीक चांगले असून, उत्पादनही चांगले निघत आहे. मात्र, सुरुवातीला २५ ते ३० रुपये किलोने विकली जाणारी मिरची सध्या सात ते आठ रुपये किलोने बाजारात विकली जात आहे.
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे, त्यांनी मे महिन्यात पाण्याचे नियोजन करून पीक घेतले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी जून महिन्यात पावसाच्या पाण्यावर लागवड केली आहे. मात्र, बाजारात मिरचीचे भाव गडगडल्याने शेतकरी हैराण झाला आहे. मिरचीचे उत्पन्न निघेपर्यंत एक किलो उत्पादन घेण्यासाठी साधारणतः २० ते २२ रुपये खर्च येत असतो. १५० रुपये मजुरी याप्रमाणे एक मजूर साधारणत: २५ किलो मिरची दिवसभरात तोडत असतो. म्हणजे शेतकऱ्यांना सहा रुपये किलोप्रमाणे मिरची तोडावी लागते. म्हणून मिरची तोडण्यापासून ते बाजारात घेऊन जाण्यापर्यंत सात ते आठ रुपये प्रतिकिलो खर्च येतो. बाजारात सात ते आठ रुपये किलोने मिरची विकली जात आहे. सध्या मिरची पिकाचा हंगाम असूनही भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
भाजीपाल्याचे भाव गडगडले
शहादा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जातात. अनेक शेतकऱ्यांच्या भाजीपाला उत्पादनावर उदरनिर्वाह चालतो. मात्र, भाजीपाल्यात टोमॅटो तीन रुपये, कारले तीन रुपये, वांगी चार रुपये प्रतिकिलो दराने मिळत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरीही आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
कोट..
सध्या मिरची पिकाला भाव मिळत नसल्यामुळे आलेले उत्पादन फेकताही येत नाही. कारण फेकून दिले तर बाजारातून मिळणारे थोडेफार पैसेही मिळणार नाहीत. त्यामुळे नुकसान कमी करण्यासाठी मिरची नाइलाजास्तव बाजारात घेऊन जावी लागत आहे. - भगवान हिरालाल खैरनार, लोंढरे, ता. शहादा