नंदुरबार : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणी पूर्ततेसाठी पाठविण्याबाबत असलेल्या उदासीनतेमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून लांबच आहेत. अनेकांना तर ही योजनाच माहिती नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षात अवघ्या २० जणांना त्याचा लाभ मिळाला आहे. याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
शेती व्यवसाय करतांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघातात बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा मृत्यू ओढावतो किंवा अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीचे अकस्मात निधन झाले तर किंवा त्यांना अपंगत्व आले तर अशावेळी कुटुंबास आर्थिक आधार म्हणून राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. शिवाय अनेकांची प्रकरणेच पुढे सरकली नाहीत.
तीन वर्षातील दाखल प्रकरणे...
n जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये १६ प्रकरणे प्राप्त होती. विमा कंपनीकडे त्यातील सर्वच प्रकरणे सादर करण्यात आली. त्यापैकी १३ प्रकरणे मंजूर करून तीन प्रकरणे प्रलंबित आहेत.
n २०१७-१८मध्ये २१ प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यातील विभागाकडे पूर्ततेसाठी आठ प्रकरणे तर विमा कंपनीकडे नऊ प्रकरणे सादर करण्यात आली. त्यातील केवळ चार प्रकरणे मंजूर झाली.
n २०१८-१९ मध्ये केवळ एक प्रकरण दाखल झाले ते पुढे सरकू शकले नाही. २०२०-२१ मध्ये किती प्रकरणे दाखल झाली याची माहिती मात्र उपलब्ध नव्हती.
अपघात आणि मिळणारी मदत...
n शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये कुटुंबीयांना मदत दिली जाते.
n अपघातात दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे. एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते.
n अपघातात केवळ एक डोळा निकामी होणे किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते.
पात्रतेसाठी अटी...
n राज्यातील महसूल विभागातील सातबारा नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील खातेदार शेतकरी यांचा व्यक्तिगत अपघात व अपंगत्वासाठी शासन विमा उतरवते.
n २००५ पासून विमा योजना अस्तित्वात असली तरी २०१५-१६ पासून नाव बदलून नव्याने ती सुरू करण्यात आली.